
सामना प्रतिनिधी, मुंबई
मराठा आरक्षणावरून मागील चार दिवस राज्यभरात आगडोंब उसळला आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कोणतीही ठोस भूमिका न घेता आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा बैठक बोलावली. मात्र ही बैठक ‘वर्षा’वर न घेता मुख्यमंत्रीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ‘सेवा सदन’ निवासस्थानी पोहोचले. या बैठकीत आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाजप मंत्र्यांमध्ये जोरदार चर्चा झडली.
या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आदी भाजपचेच मंत्री उपस्थित होते. या बैठकीत आंदोलन नियंत्रणात आणणे, त्याचप्रमाणे मराठा समाजासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

























































