फडणवीसांची शिंदेंच्या नगरविकास खात्याला तंबी! केंद्राच्या योजना राबवण्यात कुचराई केल्याबद्दल आढावा बैठकीत संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या कामकाजावर तीव्र नाराज आहेत. नगरविकास खात्याने केंद्र सरकारकडून निधी घेऊनही केंद्राच्या योजना राबवण्यात जाणीवपूर्वक केलेली कुचराई त्याला जबाबदार आहे. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत फडणवीस यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर नगरविकास विभागाकडून कंत्राटदारांना देण्यात आलेली कामे मुदतीपूर्वी न केल्यास खैर नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर होते. ‘अमृत 2.0’ या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत अधिकाऱयांकडून कुचराई झाल्याचे लक्षात आल्यानंतर फडणवीस भरबैठकीत संतापले.

‘अमृत 2.0’ म्हणजेच अटल मिशन रिज्युवेननेशन ऍण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन या योजनेचा दुसरा टप्पा आहे. तो 2021 ते 2026 या कालावधीसाठी आहे. या योजनेंतर्गत पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रीन पार्क, शहरी विकासाची कामे केली जात आहेत. योजनेसाठी लागणारा निधी केंद्राकडून वेळेवर प्राप्त होऊनही आतापर्यंत त्या योजनेचे काम ज्या प्रमाणात व्हायला हवे तितके झालेले नाही. त्याबद्दल फडणवीस यांनी अधिकाऱयांना धारेवर धरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्यात नगरविकास विभागाकडून राबवण्यात येणाऱया केंद्राच्या योजनांची माहिती फडणवीस यांनी घेतली तेव्हा योजना राबवण्यात कामचुकारपणा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.