
जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यानुसार 24 जणांवर गुन्हा दाखल करून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार विविध पथकांनी ही कारवाई केली आहे.
निलेशकुमार नंदकुमार शहाने (वय 27), महारुद्र मोहन मंदरे (वय 26), असिफ ताहीर शेख (वय 27), मोहसीन बाबू सयद (वय 48), रशिद अब्दुल सय्यद (वय 49), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय 44) अशी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात नागेश माणिक बनसोडे (वय 39) याला अटक केली आहे. तिसऱ्या गुन्ह्यात 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही अटक केली नाही. कोंढव्यात भावेश विजय शिंदे (वय 33), विक्की विद्यासागर पुडगे (वय 28), कल्पेश सीताराम इंगोले (वय 18), सोनू अशोक जगधने (वय 29), शशांक प्रकाश साळवी (वय 31), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून शिवाजीनगर, लष्कर, वडगासह विविध न्यायालयात सादर केली जात होती. त्यासाठी काही टोळ्या कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित टोळीकडून आधार कार्ड, रेशन कार्ड, आणि सातबारा उतारे बनावटरित्या तयार केली जात होती. काही प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयात तारखेला हजर राहणार नाहीत, अशा आरोपींना एजंटमार्फत बोगस जमीनदार मिळवून देत होते. बहुतांश आरोपी सराईत आणि घरफोडी, चोऱ्या करणारे होते. जामीन मिळाल्यानंतर ते कधीच न्यायालयात हजर होत नव्हते. आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे गुन्हेगारी वाढली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार पथकांनी कारवाई केली आहे.































































