कोल्हापुरात नकली नोटा छापणार्‍या टोळीला अटक, एक लाखहून अधिक किंमतीच्या बनावटी नोटा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात बनावट नोटा छापण्यार्‍या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या नकली नोटा आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे बनावट नोटा छपाई करत असल्याचे माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी  संशयित आरोपी विठ्ठल बाबू परीट याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा 2 हजार रुपयाच्या एका बाजूने छापलेल्या 51 नोटा तर 100 रुपयाच्या एका बाजूने छपाई केलेल्या 99 नोटा अशा 1 लाख 11 हजार 900 रुपयांच्या नकली नोटा पोलिसांना आढळल्या. नोटा तयार करण्यासाठी लागणारे रंगीत स्कॅनर, प्रिंटर,  लॅमिनेशन मशिन, इलेक्ट्रिक बटनाचा पॅनल बोर्ड, पेपरचा गठ्ठा असा एकूण 14 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी  विठ्ठल परीट, रवींद्र परीट, लिंगाप्पा कट्टेकरी, काकासो कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार कर्नाटक कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून तपासासाठी पथके रवाना केली आहेत.