
सामना ऑनलाईन । मुंबई
फीट येण्याचा त्रास असणारे कित्येक जण आहेत. पण मुंबईतील एक रुग्णाला फीट येण्याचा त्रास चांगलाच महागात पडण्याची वेळ आली होती. फीट येऊन गेल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णाच्या श्वासनलिकेत त्याची कवळी गेल्याचं दिसून आलं.
मुंबईचा रहिवासी असलेल्या २७ वर्षीय तरुणाला गेल्या काही काळापासून फीट येण्याचा त्रास होता. गेल्या आठवड्यात त्याला रात्री फीट आली. फीटचा त्रास कमी झाल्यानंतर त्याला श्वासोच्छवास घेण्यास अडथळा होऊ लागला. त्यामुळे त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन काढण्यात आला. त्यात त्याची कवळी त्याच्या श्वासनलिकेत अडकल्याचं समजलं.
रुग्णालयाच्या कान-नाक-घसा तज्ज्ञांनी ताबडतोब रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुर्बिणीच्या साहाय्याने रुग्णाला भूल देऊन दुर्बिणीच्या चिमट्याने ही कवळी बाहेर काढण्यात आली. तूर्तास या रुग्णाची तब्येत उत्तम असून लवकरच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. ज्यांना फीट येण्याचा त्रास आहे, अशा रुग्णांनी आरोग्याच्या बाबतीत कोणतीही हयगय करू नये. त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्लाही शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.



























































