हिंदुस्थानात बनवणार फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडने भारतात फाल्कन 2000 बिझनेस जेट्सचे उत्पादन करण्यासाठी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार केला आहे. डसॉल्ट पहिल्यांदाच फ्रान्सबाहेर म्हणजेच महाराष्ट्रातील नागपूरमध्ये फाल्कन जेट्स बनवणार आहे. पॅरिस एअर शोमध्ये या कराराची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स एरोस्ट्रक्चर ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी आहे.

रिलायन्स एरोस्ट्रक्चर आणि डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार केला असल्याने आता भारतात फाल्कन 9 जेट बनवले जाणार आहे. या निर्णयामुळे मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ मिळाले आहे. हे जेट रिलायन्सच्या महाराष्ट्रातील नागपूर येथील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) प्लांटमध्ये तयार केले जाईल. 2019 पासून फाल्कन 2000 चे काही भाग बनवले जात होते, परंतु आता या करारामुळे संपूर्ण जेट या ठिकाणी बनवले जाणार आहे. पहिले जेट तीन वर्षांनंतर म्हणजेच 2028 पर्यंत वितरित केले जाईल, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

फाल्कन 2000 जेटची किंमत जवळपास 35 कोटी रुपये इतकी आहे. फाल्कन 2000 हे जेट डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले एक उच्च दर्जाचे बिझनेस जेट आहे. हे जेट सहा हजार किलोमीटरपर्यंत न थांबता उड्डाण करू शकते. जगातील काही देशांचे मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी आणि सैन्य याचा वापर करत आहे.