
दिल्लीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडायला सुरूवात झाली आहे. यामुळे लहान मुले, शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांसह वृद्ध नागरिकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठमोठ्या शाळा- कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ हवा मिळणे आवश्यक आहे. मात्र दिल्लीच्या काही नामांकित शाळांमध्ये महिन्याला हजारो रुपये शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांसाठी एयर प्यूरीफायर सोय नसल्याचा आरोप एका शिक्षिकेने केला आहे.
दिल्लीतील एका शाळेच्या शिक्षिकेने Reddit या सोशल मीडिया अॅपवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने शाळा दर महिना 60 हजार फी घेऊनही वर्गात उत्तम सोयी नसल्य़ाने मुलांना प्रदूषणाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. मी 4 ते 5 वर्षांपासून दिल्लीतील एका हायप्रोफाईल शाळेत शिकवते. या शाळेने विद्यार्थ्यांकडून 60 हजार रुपये प्रतिमहिना घेऊन पालकांना वर्गांचा अंतर्गत AQI 30- 45 असल्याचा दावा केला होता. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष AQI तपासला तेव्हा तो 145 ते 200 च्या दरम्यान होता आणि ही खूपच भयंकर बाब आहे, असे या शिक्षिकेने पोस्टमध्ये म्हटले.

शाळेतील वर्गांची तपासणी झाल्यावर शिक्षकांनी AQI वाढल्याची तक्रार केली तेव्हा शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनाच सुनावले. एवढेच नाही तर त्यांनी AQI मीटरला मनीप्लान्टजवळ ठेवून त्याची गुणवत्ता दाखली. आणि खरी गुणवत्ता लवपण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या स्टाफच्या म्हणण्यानुसार, वर्गात लावलेले जुने एयर प्यूरीफायर आता बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांनी शाळेकडे चांगल्या कंपनीचे एयर प्यूरीफायर लावण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी बजेट नाही असे उत्तर दिले. आम्ही रोज या लहान लहान मुलांना खोकताना, डोळे चोळताना, श्वासनाचे त्रास होताना पाहतोय. मात्र याची खबरदारी कोणीही घेत नाहीये, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जर अश्याच वातावरणात ही मुले राहिली तर त्यांचे भविष्य धोक्यात आहे. एवढी फी घेऊनही जर शाळा मुलांना चांगल्या सुविधा देत नसेल तर पालकांनी मुलांना कोणच्या शाळेत पाठवायचे ? मला आता शाळेकडून किंवा शासनाकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाहीए, असे म्हणत शिक्षिकेने शाळेवर टीका केली आहे. शिक्षिकेच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी शाळेवर टीका केली आहे. एवढे पैसे उकळता तरी मुलांना चांगले आरोग्य देता येत नाही का? असे सवाल करत प्रशासनावरही टीका केली आहे.


























































