शेतकऱयांना दिलासा, कृषी पंपाला आता दिवसभर वीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे व्यापार, उद्योग आणि सेवा क्षेत्राला फटका बसला असला तरी शेतकऱयांना मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे. याआधी महावितरणकडून कृषी पंपाला रात्री दहा-बारा तास आणि दिवस केवळ सहा-आठ तास महावितरणकडून वीज पुरवठा केला जात होता. मात्र आता उद्योग आणि व्यापार ग्राहकांकडून विजेची मागणी कमी झाली असल्याने कृषी पंपाला रात्रीऐवजी दिवस 10-12 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱयांना रात्री-अपरात्री शेतात करावी लागणारी धडपड आता थांबणार आहे.

राज्यात तब्बल 50 लाखांहून आधी कृषिपंप वीज ग्राहक असून त्यांना महावितरणकडून 24 तासांपैकी 16-18 तास वीज पुरवठा केला जातो. मात्र अर्ध्याहून अधिकवेळ रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱयांची मोठी गैरसोय होते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने उद्योग आणि व्यापारी ग्राहकांचा विजपुरवठा बंद आहे. त्यामुळे एरवी महावितरणकडे नोंदली जाणारी 20 हजार मेगावॅटची मागणी 13-15 हजार मेगावॅटपर्यंत खाली अली आहे. औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकाकडून विजेची मागणी कमी झाल्याने त्यांना दिवसा पुरवली जाणारी वीज जून अखेरपर्यंत कृषी पंपाकडे वळवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.