
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, व एमआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधावारी निदर्शने करण्यात आली. यावेळी व मागण्यांचे निवेदन जामखेडचे नायब तहसिलदार विजय भंडारी यांना शेतकर्यांनी दिले. अॅड. अरुण जाधव म्हणाले की, शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने निवेदनात नमूद केलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. यानंतर आतमहत्या केलेल्या डॉ. पायल तडवी यांना श्रद्धांजली वाहून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शेळ्या-मेंढ्यांसह इतर जनावरांना छावणीचा लाभ तात्काळ मिळावा, अन्यथा छावणीपासून वंचित असलेल्या जनावरांचा मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बापूसाहेब गायकवाड, रावसाहेब खोत, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेळ्या, मेंढ्या, घोडे व गाढवांना छावणीचा लाभ मिळावा, छावणीची मुदत 30 जून ऐवजी 15 जुलै करण्यात यावी, छावणीत जनावरांसोबत थांबणाऱ्या व्यक्तीस रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार देण्यात यावा, छावणी चालकाचे अनुदान विनाविलंब द्यावे, छावणीमध्ये मोठ्या जनावरांना 18 किलो ऐवजी 25 किलो व लहान जनावरांना 9 किलो ऐवजी 15 किलो चारा देण्यात यावा, या मागण्या शेतकऱ्यांनी निवेदनात केल्या आहेत. यावेळी बापूसाहेब ओहोळ, विशाल पवार, सुनिल कथले आदी उपस्थित होते.



























































