शेतातला चित्रकार

मनीषा सावंत,maniwant@gmail.com

गावाकडची माणसं साधीभोळी असं म्हटलं जातं. तशी ती खरंच असतात का हा भाग वेगळा असला तरी सोलापूरजवळच्या भंडारकवठे या छोटय़ाशा गावात जन्मलेले चित्रकार अमित ऊर्फ बाबू आवटे यांचा स्वभाव, त्यांचं वागणंबोलणं साधंभोळंच. तोच भाबडेपणा त्यांच्या चित्रकारीत दिसून येतो. मुळात शेतकरी कुटुंबातच लहानाचे मोठे झालेल्या अमित यांची चित्रे गावच्या मातीचा सुगंध दरवळणारीच. विशेष म्हणजे वडिलोपार्जित शेती करत करतच त्यांनी आपला चित्रकलेचा छंद जोपासला आणि तो वाढवला. ते सेंद्रिय शेतीवरच भर देतात. रासायनिक शेती ते करत नाहीत. त्यांच्या चित्रांचे ‘ग्रेस इन दी सिम्प्लिसिटी’ या नावाचे प्रदर्शन नुकतेच मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरले होते.

chitra-1

शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्यांसारख्या घटना बाबू आवटे यांना त्रस्त करून सोडतात. शेतीसाठी वापरल्या जाणाऱया केमिकल्समुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग शेतकऱयांना होत आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या करतात असं त्यांचं म्हणणं आहे. या घटना कमी व्हाव्यात किंवा होऊच नयेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते म्हणतात, सेंद्रिय शेतीच करतो आणि आमच्या गावच्या आसपासच्या शेतकऱयांना अशा प्रकारच्या सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षणही मी देतो. या प्रकारच्या शेती करण्यामुळे शेतकऱयांना खर्च कमी येतो. त्यांना हे पटवून देतो. या पद्धतीने त्यांनी शेती केलीत तर  आजच्या महागाईच्या काळातही टिकू शकाल असं ते त्यांना समजावतात.

chitra-2

आवटे यांचं बालपण गावातच गेलेलं असल्यामुळे त्यांच्या चित्रकारीवर त्याचाच परिणाम झाला आहे. त्याच पद्धतीने ते चित्र काढतात. चित्रं काढण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. ते पुढे सांगतात, चित्रं काढायला मिळतील अशा ठिकाणी मला पाठवा असं मी आईवडिलांना म्हणायचो. घरच्यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा देत चित्रकलेच्या शिक्षकांकडे पाठवलं. त्यांच्यामुळेच मी चित्रकलेत पारंगत झालो. चित्रकलेत चांगले मार्क मिळाल्यामुळे पुढे कुठल्याही प्रकारचे डोनेशन वगैरे भरावे न लागता मला ऍडमिशन मिळत गेली. नंतर आवटे यांनी काही ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्नही केला, पण मुळात त्यांचं मन चित्रकलेतच रमत होतं. त्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ चित्रकलेसाठीच देऊन टाकला. आता ते स्वतंत्र चित्रे काढतात आणि त्यातूनच कमवतात. आता कमाई बऱयापैकी असल्याने ते गावाकडे परत गेले. तिथे आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करतानाच चित्रकलेचा छंदही ते जोपासत आहेत. शेतामध्येच त्यांनी आपला चित्रकला स्टुडिओ थाटला आहे.