तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

वडीलोपार्जीत जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून तहसील कार्यालयात चकरा मारून कंटाळलेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालय परिसरात सोमवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संतोष लक्ष्मण माने असे या शेतकऱ्याचे नाव आहे

मिळालेल्या माहितीनुसार, हदगांव तालुक्यातील वायफना येथील शेतकरी संतोष लक्ष्मण माने याच्या वडिलांचे दोन वर्षापूवी निधन झाले. त्यांच्या नावे असलेली शेती वारसदार म्हणून आपल्या नावे करून द्यावी यासाठी त्याने रितसर अर्ज केला होता. तलाठी व गीरदावार तसेच तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र प्रशासन याबाबत टाळा टाळ करत होते. २४ मे रोजी संतोष माने याने आपल्याला वारसा प्रमाणपत्र तसेच शेती नावावर करून न दिल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा एका पत्राद्वारे तहसीलदारांकडे दिला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

संतोष माने सोमवारी दुपारी तहसील कार्यालय परिसरात आला आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी त्याला वाचवले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकारामुळे हदगांव तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला.