कांदा खरेदी करताना शेतकऱ्याचा हार्ट अॅटकने मृत्यू

477

नापिकी, दुष्काळ आणि सावकारी कर्जापाठोपाठ आता महाग होत चाललेला कांदाही शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या जीवावर उठला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात रायथू बाजारात सबसिडीचा स्वस्त कांदा खरेदी करण्यासाठी प्रचंड रांगेत उभा राहिलेल्या आर. संबैया (55) या शेतकर्‍याचा रांगेतच हृदयक्रिया बंद पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. कांदा दरवाढीने घेतलेला हा देशातला पहिला बळी ठरला आहे.

देशातील अन्य राज्यांप्रमाणे आंध्र प्रदेश सरकारने स्वस्त दरातील कांद्याची विक्री सुरू केली आहे. सोमवारी सकाळपासून विजयवाडाच्या रायथू बाजारात सबसिडीचा स्वस्त कांदा विकत घेण्यासाठी नागरिकांची भलीमोठी  रांग लागली होती. आंध्रात शेतीवर कुटुंबाची गुजराण करणारा संबैया हा मध्यमवयीन शेतकरी कांदा खरेदीसाठी रांगेत उभा होता. सुमारे 10 मिनिटे रांगेत उभे राहिल्यानंतर संबैयाला अस्वस्थपणा जाणवू लागला. तो रांग सोडून शेजारच्या फूटपाथवर जाऊन बसला. रांगेतील नागरिकांनी संबैयाची अवस्था पाहून त्याची विचारपूस सुरू केली, पण काही मिनिटांतच तो बेशुद्ध होऊन पडला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. मृत संबैयामागे पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

पोलीस म्हणतात, संबैयाची ऑन्जिओप्लास्टी झाली होती

कांदा खरेदीच्या रांगेत मृत्यू झालेल्या संबैयाच्या हृदयावर काही महिन्यांपूर्वी ऑन्जिओप्लास्टी झाली होती. तो बराच वेळ रांगेत उभा राहिल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, तत्काळ उपचार न मिळाल्याने संबैयाची हृदयक्रिया बंद पडून त्याचा मृत्यू झाला अशी माहिती गुडीवाडा-2 टाऊन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीहरी यांनी दिली. संबैयाला याआधीही हृदयविकाराचा झटका आला होता, असेही त्यांनी सांगितले. सर्व सोपस्कारांनंतर संबैयाचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या