शेतकर्‍यांची चौथ्यांदा दिल्लीला धडक, योगेंद्र यादव आणि मेधा पाटकर यांची सरकारवर टीका

37

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांनी आपल्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानाहून संसद भवनाकडे लाँग मार्च काढला. परंतु पोलिसांनी त्यांना संसद भवन मार्गावरच रोखलं. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे महासचिव योगेंद्र यादव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच यावेळी मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

यादव म्हणाले की, “देशातला सर्व शेतकर्‍यांना जोडणारा दुवा म्हणजे त्यांचे दुःख. गेल्या दीड वर्षात शेतकरी दिल्लीत अनेक वेळा आले आहेत. चौथ्यांदा शेतकर्‍यांनी राजधानी धडक दिली आहे. परंतु सरकारने यावर कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही.” मोदी सरकार हे इतिहासातले सर्वात मोठे शेतकरी विरोधक सरकार आहे असल्याची टीका यादव यांनी केली.

समाज सेवक मेधा पाटकर याही मोर्चात सामील झाल्या. या आंदोलनात २०८ शेतकरी संघटना सामील झाल्याचे त्यांनी सांगितले. पाटकर म्हणाल्या, की हिंदुस्थान हा कृषीप्रधान संस्कृती असूनही आतापर्यंत ३ लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. शेतकर्‍यांनी त्यांच्या समस्येसाठी संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली. या आंदोलनात मच्छीमार, दुग्ध व्यावसायिक, मजूर आणि आदिवासी पहिल्यांदा एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या