
सामना प्रतिनिधी । मुंबई
एकीकडे महागाई वाढत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान हमीभावही मिळत नसल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर तूर, हरभरा फेकून आंदोलन केले. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ खळबळ उडाली.पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले.
मंत्रालयासमोर सातत्याने आत्महत्यांचे प्रयत्न होत असल्याने सध्या मंत्रालयाबाहेर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. अनेक साध्या वेशातील पोलीस तैनात असतात. त्यांनी तातडीने या आंदोलकांना ताब्यात घेऊन मंत्रालयासमोरील रस्ता खुला केला.
























































