
ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊसतोडणी करताना, ऊसपीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊसक्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून ऊसतोडणीसाठी शेतकऱ्य़ांकडून पैशांची मागणी केली जाते. मुकादमाकडून होणाऱ्य़ा या मनमानीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम मजूर मुकादम आणि वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलामधून कारखान्यांनी वसूल करून ती शेतकऱ्य़ांना द्यावी, असे आदेश सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
ऊसउत्पादक शेतकऱ्य़ांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तालयाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हे आदेश जारी करून त्याची अंमलबजावणी करण्यास साखर कारखान्यांना बजावले आहे.
हंगामाच्या काळात अनेक ऊसतोडणी मजूर वाहतूकदार त्यांचे मुकादम यांच्याकडून ऊसपीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊसक्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून ऊसतोडणीसाठी शेतकऱ्य़ांकडून पैशांची मागणी केली जाते. याबद्दलच्या तक्रारींसाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्य़ांची नेमणूक करावी, तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसतोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच प्रसिद्धिमाध्यमांव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करावी. शेतकऱ्य़ांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्य़ांकडे घटना घडल्यावर लगेच करावी. अशा प्रकारच्या घटना घडल्यास आणि तक्रार आल्यास त्याची तत्काळ पडताळणी करून चौकशीमध्ये तथ्य आढळून आल्यास शेतकऱ्य़ांकडून घेतलेले पैसे मजूर मुकादम आणि वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून कारखान्यांनी ते शेतकऱ्य़ास परत करावेत, त्याची जबाबदारी तक्रार निवारण अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ऊसगाळपाबाबत शेतकऱ्य़ांनी शंका घेऊ नये
राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथेनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतकऱ्य़ांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरही ऊसगाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असल्याचे साखर आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.





























































