लष्करी अळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त

110

 

सामना ऑनलाईन | धुळे

पावसाने झोडलं आणि राजानं मारलं तर कुठे जायचे, असा सवाल विचारला जातो. धुळ्यातील शेतकरी मात्र पावसाने झोडलं आणि अळीने मारलं तर करायचे काय, असा सवाल करीत  आहेत.  पावसाने विलंब केला म्हणून कपाशीऐवजी शेतकऱयांनी मक्याची पेरणी केली, परंतु मक्यावर अमेरिकन लष्करी प्रादुर्भाव झाल्यामुळे मक्याचे पीक हाती येण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे धुळे तालुक्यासह जिह्यातील शेतकरी हताश-चिंताग्रस्त झाले आहेत.

धुळे जिह्यात यंदा सलग चौथ्या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत कपाशीवर बोंडअळीने घाला घातला. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी कृषी विभागाने यंदा 25 मेनंतर कपाशीची लागवड करावी असे सुचविले. तत्पूर्वी, शेतकऱयांना बियाणे हाती लागणार नाही कशी काळजीदेखील घेतली, परंतु कपाशीसाठी अपेक्षित पाऊस झाला नाही. लांबलेला पाऊस लक्षात घेऊन शेतकऱयांनी कपाशीऐवजी मक्याची पेरणी केली. जूनअखेरच्या भुरभुरत्या पावसाने पेरणीसाठी प्रवृत्त केले.

पेरणी झालेल्या मक्याला जुलैच्या पहिल्या आठवडय़ातील भुरभुरत्या पावसाने साथ दिली, पण नंतर पाऊस बेपत्ता झाला. जेमतेम आकार घेत असलेल्या मक्यावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला. धुळे तालुक्यातील तिखी, मोहाडी, रानमळा या परिसरातील शेतकरी लष्करी अळीने त्रस्त झाले आहेत. गाठीशी असलेला अनुभव लक्षात घेऊन शेतकरी लष्करी अळीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण लष्करी अळी नियंत्रणात येत नाही. अशा परिस्थितीत कृषी विभागाने उपाययोजना सुचवायला हव्यात अशी अपेक्षा शेतकऱयांना आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या