‘सोलर पॅनल’ बनवणाऱ्या कंपनीने लातूर येथील एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली होती. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर कंपनी वठणीवर आली असून या शेतकऱ्याच्या घरावर पुढील सात दिवसांत सोलार पॅनल बसवून देण्याची तयारी कंपनीने दर्शवली.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांना प्राधान्य द्यावे यासाठी राज्य व केंद्र सरकार जनजागृती करत आहेत, परंतु त्याचा गैरफायदा घेत काही कंपन्या ग्राहकांची फसवणूक करतायत. अशीच एक तक्रार लातूर येथील जाधव या शेतकरी कुटुंबीयांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे केली.
जाधव यांनी एम्फिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे लातूर येथील त्यांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याकरिता सव्वादोन लाख रुपये भरले, परंतु या पैसे मिळाल्यानंतर कंपनीने पॅनल बसवण्यास टाळाटाळ केली व जबरदस्ती पंपनीची फ्रेंचायझी जाधव यांच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न केला तसेच घेतलेले पैसे परत करण्यास मनाई केली.
…तर कायदेशीर धडा शिकवू
शेतकऱ्याने यासंदर्भात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार केल्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने एम्फिन इंडिया कंपनीचे संचालक राजपूत यांची मालाड येथील कार्यालयात भेट देऊन जाब विचारला. अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कंपनी फसवणूक करत असेल तर कक्षाच्या वतीने कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल, असे शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान सांगितले. तसेच सर्व करार हे मराठीत असावेत जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी मागणीदेखील सदर बैठकीदरम्यान कक्षातर्फे करण्यात आली. ही मागणी कंपनीने त्वरित मान्य केली.
शेतकऱ्याने मानले शिवसेनेचे आभार
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या मागणीनुसार जाधव यांना पुढील सात दिवसांत भरलेल्या रकमेचे सोलार पॅनल त्यांच्या घरावर बसवून देण्यास कंपनीने तयारी दर्शवली. त्यामुळे या शेतकऱ्याने शिवसेनेचे आभार मानले आहेत. सदर शिष्टमंडळात कक्षाचे खजिनदार देविदास माडये, लोकसभा समन्वयक संजय पावले, अॅड. अभिराज परब, कक्ष विधानसभा संघटक विक्रम शाह, कार्यालय चिटणीस शारदा घुले, उपसंघटक विजय पवार, अजय सावरकर, आशा रजक उपस्थित होते.