
अज्ञात व्यक्तीने डोंगरावरील गवताला आग लावल्याने मोठय़ा प्रमाणात वणवा पसरून डोंगराशेजारी असलेल्या शेतातील 4 पॉलिहाउस जळून खाक झाले आहेत. त्यामुळे शेतकऱयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वणवा पेटवणाऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
नगर तालुक्यातील सारोळा कासार व अस्तगाव (ता. पारनेर) या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या डोंगरावरील तरवडी मळा येथे ही घटना घडली.
तरवडी मळ्यात मनीषा जालिंदर काळे यांच्या नावे शेतजमीन असून, शेतात त्यांनी व कुटुंबीयांनी 4 पॉलिहाउस उभारलेले होते. 3 दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी या शेताजवळ असलेल्या डोंगराला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली असल्याने डोंगरावरील गवत पूर्णपणे वाळलेले आहे. त्यामुळे या आगीचा वणवा लांबपर्यंत पसरला. डोंगरालगतच काळे यांचे शेत असल्याने तिथपर्यंत आग पसरली व शेतात असलेले 4 पॉलिहाउस जळून खाक झाले. या पॉलिहाउसमध्ये सिमला मिर्ची व वांगी लावलेली होती. या भाजीपाला पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.
या भागातील डोंगराला दरवर्षीच आग लावण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे डोंगरालगत असलेल्या शेतकऱयांचे नेहमीच मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. या आग लावणाऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱयांकडून केली जात आहे.


























































