
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उमरी येथे अजित पवार गटाच्या पक्षप्रवेश मेळाव्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि काही शेतकऱ्यांना ताब्यात घ्यावे लागले.
आज उमरी येथे आयोजित मेळाव्यात काही जणांचाअजित पवार गटात प्रवेश झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही शेतकरी अचानक उठले आणि “शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा” अशा घोषणा दिल्या. सुमारे तीन ते चार मिनिटे चाललेल्या या घोषणाबाजीमुळे सभेत एकच गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी “शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफीवर बोला” अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली, त्यामुळे अजित पवारांना आपले भाषण थांबवावे लागले.
यावर अजित पवार यांनी, “आजपर्यंत तीन वेळा कर्जमाफी झाली आहे. एकदा केंद्र सरकारने आणि दोनदा राज्य सरकारने कर्जमाफी दिली. सध्या आर्थिक संकटामुळे कर्जमाफीची घोषणा योग्य वेळी होईल,” असे उत्तर दिले. मात्र, शेतकऱ्यांनी “आजच कर्जमाफी जाहीर करा” असा आग्रह धरला. यामुळे सभेतील गोंधळ वाढला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत काही शेतकऱ्यांना सभास्थळावरून बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. सभा संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजा संकटात असून, या काळात शेतकरी हवालदिल झाल्याने शेतकर्यांच्या रोषाला वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांना सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार उमरी येथे घडला. त्यामुळे संयोजकांची चांगलीच पंचाईत झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा गोंधळ थांबला.




























































