
सामना प्रतिनिधी । वडवणी
वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील एका ३५ वर्षीय शोतकऱ्याने कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. दिवसभरातील बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्याची ही दुसरी आत्महत्या आहे.
कोठारबन येथील परमेश्वर साहेबराव डोंगरे वय ३५ वर्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याची चार एकर कोरडवाहू शेती आहे. त्या शेतीत कापुस, बाजरी, तुर असे पीक घेतले होते. पाऊस पडत नसल्यामुळे शेतातील उभे पीक डोळ्यादेखत जळत आहे हे पाहुन डोंगरे अस्वस्थ होता. शेतीच्या उत्पन्नातून बँकेचे व खाजगी सावकाराचे जवळपास तीन ते चार लाख रूपयांचे कर्ज फेडायचे होते. मात्र शेतीनेही धोका दिल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत परमेश्वर डोंगरे याने दिनांक २७ रोजी विषारी औषध प्राशन केले. बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना काल दिनांक २८ रोजी त्याची जीवनयात्रा संपली. त्याच्या पश्चात अक्षय परमेश्वर डोंगरे, दिनेश परमेश्वर डोंगरे ही दोन मुले तर कोमल परमेश्वर डोंगरे ही मुलगी, पत्नी लक्ष्मी परमेश्वर डोंगरे, आई जिजाबाई साहेबराव डोंगरे, वडील साहेबराव गणपती डोंगरे असा परिवार आहे.


























































