पाचोर्‍यात शेतकऱ्यांची तारांबळ, जनधनचे खाते उघडण्यासाठी महिलांच्या रांगा

1076

कोरोना वायरसमुळे नागरिकांच्या समस्यांचा पाढा काही कमी होतांना दिसत नाही आहे. पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सकाळ पासुनच शहरा लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, यासारखे कडधान्य विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीचे मेन गेट बंद करण्यात आले आहे व मागील गेटने वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचे वजन करुन मुख्य दरवाजाने त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला होता. यामुळे बाजार समितीच्या मागील गेट पासुन पुनगाव रोड, शासकीय विश्रामगृह, राजे संभाजी चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत सुमारे दोन ते तीन कि.मी. पर्यंत ट्रॅक्टर, मालवाहु रिक्षा या सारख्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना कडक उन्हात नंबर लावुन आपला नंबर लागण्याच्या प्रतिक्षेत होते.

रविवारची सुट्टी व सोमवारी महावीर जयंतीमुळे सलग दोन दिवस बँका बंद असल्याने मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासुनच ग्राहकांनी बॅंकांसमोर रांगा लावल्या होत्या. याच सोबत बँकांचे खाजगी सेंटर वर जनधनचे नवीन खाते उघडण्यासाठी महिलांनी रणरणत्या उन्हात लांब रांगा लावल्या होत्या. एकुणच कोरोना व्हायरसमुळे जनजीवन कसे विस्कळीत झाले आहे हे यावरून दिसुन येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या