खासगी क्लासेसचे इंटिग्रेटेड अकरावी प्रवेश न रोखल्यास तीव्र आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

इंजिनीयरिंग प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल पाहून अनेक खासगी कोचिंग क्लासेसनी मुंबईत कनिष्ठ महाविद्यालयांच्या संगनमताने इंटिग्रेटेड अकरावी प्रवेशाचे काळेधंदे सुरू केले आहेत. ‘इंटिग्रेटेड प्रवेश बेकायदेशीर आहे’ असे जाहीर करत ते पूर्णपणे बंद केले जातील, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. तरीसुद्धा खासगी क्लासवाल्यांचे हे धंदे सुरूच असून ते वेळीच रोखा; अन्यथा तीक्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा सेनेने आज शिक्षण विभागाला दिला.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे, वैभव थोरात आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी आज यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गेल्या वर्षी युवा सेनेने इंटिग्रेटेड अकरावी प्रवेशाबाबतची माहिती तत्कालीन उपसंचालकांना पुराव्यासह दिली होती. पुढच्या वर्षीपासून असे प्रवेश बंद होतील याची खबरदारी घेऊ आणि शिक्षकांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाईल, असे आश्वासन विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. परंतु त्यांना त्याचा विसर पडला असून शिक्षण विभागाने तातडीने आपल्या संकेतस्थळावर इंटिग्रेटेड प्रवेशांबाबत महाविद्यालयांना सूचना द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.