लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांचे खंदे समर्थक, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव ऍड. राहुल बबनराव झावरे यांच्यावर आज दुपारी पारनेर बसस्थानक चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला करणारांमध्ये विखे समर्थक माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, माजी नगरसेवक नंदकुमार सदाशिव औटी व इतर सात ते आठ जणांचा समावेश होता.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेले ऍड. राहुल झावरे यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ऍड. झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समजताच नीलेश लंके यांच्या समर्थकांनी पारनेरकडे धाव घेतली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लंके समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. मोठय़ा संख्येने लंके समर्थक जमा झाल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण होते.
ऍड. राहुल झावरे, रवींद्र राजदेव, लंके यांचे स्वीय सहायक संदीप चौधरी, राजू तराळ हे भाळवणी रस्त्याने पारनेरकडे येत असताना पारनेर बसस्थानक चौकात विजय औटी, नंदकुमार औटी व त्यांच्या सहकाऱयांनी झावरे यांची मोटार रोखली. ऍड. झावरे यांना गाडीबाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी त्यांना मारहाणीतून वाचविले. या हल्ल्यात ऍड. राहुल झावरे यांच्या स्विफ्ट कारच्या सर्व काचाही फोडण्यात आल्या. लाकडी दांडके तसेच कोयत्याने झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, जखमी राहुल झावरे यांचा जबाब नोंदविण्यात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
लंके समर्थकांवर लाठीचार्ज
मारहाणीनंतर विजय औटी, नंदकुमार औटी तसेच मारहाण करताना उपस्थित असलेले त्यांचे सहकारी पारनेर पोलीस ठाण्यात गेले. लंके समर्थकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. मोठय़ा संख्येने असलेल्या लंके समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. दरम्यान, पोलीस ठाणे परिसरात जमलेल्या लंके समर्थकांकडून विखे समर्थकांना मारहाण करण्यात आली. विखे समर्थकांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली.
औटींच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त
राहुल झावरे यांना मारहाण झाल्याचे वृत्त तालुक्यात पसरल्यानंतर मोठय़ा संख्येने नीलेश लंके समर्थक पारनेरमध्ये जमा झाले. त्यांनी विजय औटी यांच्या बंद असलेल्या संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे औटी यांच्या निवासस्थानाबाहेर शीघ्र कृती दलाच्या जवानांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
हुकूमशाही, दादागिरीला खतपाणी नको
पराभव पचविण्याची ताकद या कुटुंबाने दाखविली पाहिजे. असे भ्याड हल्ले करून पुन्हा एकदा हुकूमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालत आहेत, असे निदर्शनास येत आहे. कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम नेत्यांनी करायचे असते. तसे केले नाही तर अशा घटना वारंवार घडतील, त्याला पराभव झालेलेच जबाबदार असतील, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला.
बाचाबाची कळीचा मुद्दा
n गुरुवारी सकाळी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचे समर्थक प्रितेश पानमंद आणि झावरे यांच्यात बाचाबाची झाली होती. हीच बाचाबाची झावरे यांना मारहाण होण्यास कारणीभूत ठरली. झावरे व इतर सहकारी गोरेगावमधून परतल्यानंतर पानमंद याने विजय औटी यांना फोन करून बाचाबाचीची माहिती दिली. त्यानंतर औटी व त्यांच्या सहकाऱयांनी पारनेर बसस्थानक चौकात झावरे यांच्यावर हल्ला केला.
खासदार नीलेश लंके यांचे समर्थक ऍड. राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे हल्ला करण्यात आला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे हे सांगणारी ही घटना आहे. गृहखात्याने याची तातडीने दखल घ्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करून राजकीय व सामाजिक सलोख्याचे गुन्हेगारीकरण करणाऱया या प्रवृत्तींना कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्ही या घटनेचा निषेध करीत आहोत. याप्रसंगी आम्ही सर्वजण ऍड. झावरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी
निवडणुकीतील जय-पराजय पचवता आला पहिजे. पारनेरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. राहुल झावरे यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. विखे यांचे समर्थक विजय औटी, नंदू औटी व त्यांच्या सहकाऱयांनी हा हल्ला केला आहे. माजी सरपंच नगरे व इतर सहकारी मध्ये पडले नसते तर वेगळी घटना घडली असती. जिह्यातील पोलीस खाते कुणाच्या इशाऱयावर चालते? पालकमंत्र्यांचा कट्टर कार्यकर्ता हल्ले करीत असेल तर त्यास संरक्षण देता कामा नये. त्याच्यावर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
– राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
ऍड. राहुल झावरे यांच्यावर झालेला हल्ला सुनियोजित होता. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना नगर येथे हलविण्यात आले. नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
– डॉ. बाळासाहेब कावरे, नीलेश लंके समर्थक