
सामना ऑनलाईन, कीव्ह
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर, मॅनेजरना अनेकदा ग्राहकांकडून हीन दर्जाची वागणूक मिळते. हॉटेलचं नाव खराब होऊ नये म्हणून हे कर्मचारी राग गिळून तोंडावर हास्य कायम ठेवत त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करत असतात. युक्रेनमधल्या कीव्ह भागातील गुर्राम्मा इटालिआना रेस्टॉरंटमधल्या वेटरचा संयम सुटला आणि त्यानंतर जो काही प्रकार घडला तो सध्या जगभर चर्चिला जातोय.
या हॉटेलमध्ये दोन महिला जेवायला आल्या होत्या. या दोघी वेटरशी आणि त्याच्या सहकाऱ्याशी उद्धटपणे वागत होत्या. या वेटरने त्यांच्यासाठी केक आणला होता. या केककडे बघत त्या महिलांनी शिव्या देत विचारलं की आम्ही हा केक का खावा ? यामुळे संतापलेल्या वेटरने हातातला केक एका महिलेच्या तोंडाला फासला. यामुळे तिच्यासोबत असलेली महिला आरडाओरडा करत आणखीनच शिव्या द्यायला लागली. तिला शिव्या देत असल्याचं पाहून वेटरच्या सहकाऱ्याने दुसरा केक तिच्या तोंडाला फासला. या ग्राहकांनी नेमकं काय केलं ज्यामुळे वेटर आणि त्याचा सहकारी भडकले हे कळू शकलेलं नाही.
हॉटेलमध्ये घडलेला हा प्रकार दुसऱ्या एका ग्राहकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. घडल्या प्रकाराबाबत जेव्हा हॉटेलच्या व्यवस्थापकाला विचारण्यात आलं तेव्हा त्याने सांगितलं की ग्राहक जरा जास्तच उद्धटपणे वागत होते ज्यामुळे वेटरने त्यांच्या तोंडाला केक फासला. या वेटरविरूद्ध काही कारवाई झाली का हे कळू शकलेलं नाही.

























































