काटवण मळा परिसरात बिबट्या जेरबंद

सिन्नर तालुक्यातील गोंदे येथील काटवण मळा भागात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी सकाळी बिबट्याची मादी जेरबंद झाली. काटवण मळा परिसरात मक्याची शेती आहे. लपणक्षेत्र मोठे असल्याने तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शेतीकामे करण्यातही अडचणी येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने शेतकरी गणेश तांबे यांच्या शेतात पिंजरा लावला. रविवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास त्यात एक बिबट्या जेरबंद झाला. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वन संरक्षक कल्पना वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणगावचे वनपाल प्रीतेश सरोदे, दापूरचे वनरक्षक रूपावली गायकवाड, वन कर्मचारी रोहित लोणारे, निखील वैद्य, वसंत आव्हाड यांसह सिन्नरच्या वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला मोहदरी वन उद्यानात आणण्यात आले. ती चार वर्षांची मादी आहे. परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असल्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, रात्री बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन वन विभागाने केले. पथकाची गस्तही कायम आहे.