
सामना ऑनलाईन, वसई
वसईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नवजात अर्भकाची हत्या करून त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून टेरेसवर फेकून देण्यात आल्याने नालासोपारा येथे रांजणपाडय़ात खळबळ उडाली. ज्या साक्षी इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह मिळाला तेथे सीसीटीव्ही नसल्याने गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी परिसर पिंजून काढला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील रांजणपाडा येथे साक्षी इमारतीच्या टेरेसवर एका नवजात अर्भकाचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून देण्यात आल्याची खबर तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बने यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली असता चिमुकल्या बाळाचा मृतदेह मिळाला. हा मृतदेह गेल्या 2 दिवसांपासून तेथेच पडून असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. इमारतीत एका फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असल्याने टेरेस उघडा ठेवण्यात आला, त्याचाच फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने हा मृतदेह येथे फेकून दिल्याची शक्यता इन्स्पेक्टर डॅनियल बने यांनी व्यक्त केली.
मॅटर्निटी होमवर नजर
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाला 2 दिवसांत मिळेल असे बने यांनी सांगितले. सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडथळे निर्माण झाले असले तरी गुन्हेगारांना अटक केली जाईल असेही ते म्हणाले. रांजणपाडा परिसरातील मॅटर्निटी होमवर आमची नजर आहे.
उल्हासनगरात शाळेजकळ अर्भक सापडले
नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक येथील न्यू ईरा शाळेच्या प्रवेशद्वाराजकळ सापडले. राकेश राजौडिया हे पालिकेत हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी न्यू ईरा शाळेजवळ कुत्रा उभा होता. त्याला हाकलण्यासाठी राकेश गेले असता आडोशाला उघडय़ावर टाकलेले स्त्री जातीचे मृत अर्भक त्यांना दिसले. राकेश यांनी पोलिसांना याबाबत कळवले असता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.




























































