तो क्षण माझ्यासाठी विलक्षण होता – दिव्या देशमुख

ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीविरुद्धची अंतिम लढत स्पर्धेतील सर्वात कठीण व परीक्षा घेणारे क्षण होते. मात्र मी कसलेही दडपण न घेता शांत व संयमी खेळ करून विजेतेपद जिंकले. मी जिंकली यावर माझा विश्वासच बसला नव्हता. त्यामुळेच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. जेव्हा माझ्या खांद्यावर तिरंगा ध्वज आला तो माझ्यासाठी व देशासाठी मोठा क्षण होता, अशी भावना जगज्जेत्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

माझी भावना कशी व्यक्त करू हे समजत नव्हते माझ्या ‘वर्ल्ड कप’मधील कामगिरीनंतर बुद्धिबळाला आता नागपूर व महाराष्ट्रात निश्चितच बुस्ट मिळणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मुला-मुलींनी या खेळात करिअर बनविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘वर्ल्ड चॅम्पियन’ दिव्या देशमुखने आज हिलटॉप पब्लिक स्पूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.

बातुमी (जॉर्जिया) येथे नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या विश्व करंडक बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करून बुधवारी रात्री मायदेशी परतलेल्या दिव्याने स्पर्धेतील आपले अनुभव शेअर केले. ती म्हणाली, स्पर्धेतील अनुभव खूप चांगले होते. ते मी शब्दात सांगू शकत नाही. जगज्जेतेपद मिळविणे ही निश्चितच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. पण एवढय़ावरच समाधानी राहणार नाही. मला भविष्यात अजून बरेच काही मिळवायचे आहे. त्यासाठी मी आणखीन कठोर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले.