
सामना ऑनलाईन | सेंट पिटर्सबर्ग
बेल्जियमने शनिवारी पुनः मैदानात आपल्या खेळाचा जलवा दाखवत इंग्लंडचे आव्हान २-० असे सहज संपुष्ठात आणले आणि २१व्या फिफा विश्वचषकात तिसरे स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. थॉमस मुनेर आणि इडन हजार्ड रेड डेव्हिल्स बेल्जियमच्या विजयाचे शिल्पकार ठरले. स्पर्धेत आतापर्यंत चमकदार खेळ करणाऱ्या माजी विजेत्या इंग्लंडचा बचाव शनिवारी प्ले ऑफच्या सामन्यात पार फ्लॉप ठरला. मुनेरने पूर्वार्धात चौथ्या मिनिटालाच गोल नोंदवत बेल्जिअमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हजार्डने ८२ व्या मिनिटाला दुसरा गोल डागत बेल्जिअमला २-० असे आघाडीवर नेले.फिफा विश्वचषकासाठी आता रविवारी फ्रान्स आणि क्रोएशिया या संघांत अंतिम लढत रंगणार आहे.



























































