
रविवारी मोरोक्को संघाने बलाढय़ व जागतिक रँकिंगमध्ये दुसऱया स्थानावर असलेल्या बेल्जियम संघाला पराभूत करीत कतारच्या फिफा विश्वचषकात आणखी एक सनसनाटी निकालाची नोंद केली. विशेष म्हणजे रविवारच्या या महत्त्वपूर्ण लढतीत मोरोक्कोचा नियमित गोलकिपर यासिने बोनोऊ राष्ट्रगीत संपल्यावर गूढरीत्या गायब झाला. या लढतीत मोरोक्कोसाठी गोलरक्षण राखीव गोलरक्षक मुनीर अल काजौरी याने केले, पण विशेष म्हणजे मुनीरने अप्रतिम गोलरक्षण करीत बलाढय़ बेल्जियमची अनेक आक्रमणे समर्थपणे परतावून लावली. त्यामुळेच मोरोक्कोला स्पर्धेत उलटफेर नोंदवणारा निकाल नोंदवत बेल्जियमला पराभूत करता आले. मोरोक्कोच्या संघ व्यवस्थापनाने नियमित गोलकिपर बोनोऊ याच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.
बेल्जियन चाहत्यांकडून जाळपोळ
जागतिक रँकिंगमध्ये तळाला असणाऱया मोरोक्कोकडून दुसरे रँकिंगप्राप्त बेल्जियमला रविवारी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. आपल्या संघाचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे बेल्जियन फुटबॉल शौकीन अतिशय संतप्त झाले आहेत. काही संतप्त चाहत्यांनी देशाची राजधानी ब्रुसेल्स येथे अनेक गाडय़ांची जाळपोळ आणि तोडपह्ड करीत आपला संताप व्यक्त केला. देशाच्या अँटवर्प आणि लीज या शहरांतही तंग वातावरण आहे.