उत्तर प्रदेशात SIR ची अंतिम मतदार यादी जाहीर; जानेवारीच्या तुलनेत ८४ लाखांहून अधिक मतदारांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआयआर (SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी लखनौमध्ये माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. नव्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील एकूण मतदारांची संख्या आता १३ कोटी ३९ लाख ८४ हजार ७९२ वर पोहोचली आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा (ड्राफ्ट) यादीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत ८४ लाख २८ हजार ७६७ ने मोठी वाढ झाली आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

या अंतिम यादीत ७ कोटी ३० लाख ७१ हजार ६१ पुरुष मतदार (५४.५४%), ६ कोटी ९ लाख ९ हजार ५२५ महिला मतदार (४५.४६%) आणि ४,२०६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जानेवारीतील मसुदा यादीत ही संख्या १२ कोटी ५५ लाख इतकी होती. या एसआयआर प्रक्रियेमुळे लिंग गुणोत्तरामध्ये (Gender Ratio) १० अंकांची सुधारणा होऊन ते ८३४ वर पोहोचले आहे. तसेच, १८ ते १९ वयोगटातील तरुण मतदारांच्या संख्येत १४ लाख २९ हजार ३७९ ने वाढ झाली असून, या वयोगटातील एकूण मतदार १७ लाख ६३ हजार ३६० झाले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, प्रयागराजमध्ये सर्वाधिक ३ लाख २९ हजार ४२१ मतदारांची वाढ झाली आहे. त्याखालोखाल लखनौ, बरेली, गाझियाबाद आणि जौनपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास साहिबाबादमध्ये सर्वाधिक ८२ हजार ८९८ नव्या मतदारांची नोंद झाली आहे.