
सामना ऑनलाईन, नगर
जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरात तंबाखू, मावा खाऊन थुंकणाऱ्या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड कोला असून, ही घटना मंगळवारी घडली. कुणाल भिंगारदिवे (रा. भीमनगर,भिंगार) आणि अनिल बाळासाहेब चिंतामणी (रा. मिसाळ गल्ली, नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल भिंगार दिवे (रा. भीमनगर,भिंगार) याच्याविरुद्ध सहायक फौजदार युसूफ शेख यांच्या फिर्यादीवरून (एनसी) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुणाल भिंगार दिवे याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तसेच दुसऱ्या घटनेत सहायक फौजदार किशोर भिंगार दिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल बाळासाहेब चिंतामणी (रा. मिसाळ गल्ली, नगर) याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला ५०० रुपये दंड ठोठावला. या खटल्यात साक्षीदार, पुरावा म्हणून पो. ना. वसीम पठाण, समीर शेख, हजर होते.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयाच्या आवारात तोंडात तंबाखूजन्य पदार्थ ठेवल्याने न्यायालयाने भिंत पुसण्याचे आदेश दिले होते. न्यायालय परिसरात मावा व तंबाखू खाऊन थुंकण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, नुकताच वकील संघटनेने न्यायालय आवारात अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे.





























































