
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांचे तब्बल 11 हजार 820 खटले लोक अदालतीत निकाली लागले. शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजनकर यांच्या पुढाकाराने ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील प्रलंबित खटले निकाली काढून त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 32 लाख 70 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ठाणे वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा यासाठी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांनी सिग्नल जम्प, बेशिस्त वाहन पार्किंग, दारू पिऊन वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, हेल्मेट-सीटबेल्टचा वापर न करणे यांसह विविध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली. मात्र या दंडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक शाखेकडून खटले दाखल करण्यात आले होते. हजारो प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच चालकांना दंडाच्या रकमेत सवलत मिळावी यासाठी १३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान निर्धारित कालावधीत थकीत दंड भरणाऱ्यांना सवलतीचा लाभही देण्यात आला.





























































