भाजपच्या माजी नगरसेविकेला 10 कोटींचा गंडा, रावसाहेब दानवेंच्या नातवासह आठजणांवर गुन्हा

नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका अलका अहिरे व त्यांचे पती कैलास अहिरे यांना 10 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको भागात अलका अहिरे भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती कैलास अहिरे हे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीत या दांपत्याच्या मालकीची एन. व्ही. ऑटोपेअर्स प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीच्या नावावर नाशिकच्या सेंट्रल बँक येथे घेतलेल्या कर्जाची थकबाकी होती. कर्ज फेडण्याकरिता आपण मदत घेण्यासाठी सप्टेंबर 2018 मध्ये मुंबईत नरिमन पॉइंट येथे तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना भेटलो. “घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्जाची सेटलमेंट करून देतो’’, असे सांगून त्यांनी बँक व्यवस्थापकाला फोनही केला. “तुला आता या कर्जाच्या खाईतून बाहेर काढतो, पाचशे कोटींची वार्षिक उलाढाल करून देतो’’, असे आश्वासन त्यांनी दिले, असा अहिरे यांचा दावा आहे.

या भेटीनंतर तिसऱयाच दिवशी नाशिक येथे येऊन आमच्या कंपनीची दानवे यांचे नातू शिवम यांनी सहकाऱयांसह पाहणी केली. “या सर्वांना तुझ्या कंपनीचे 14 टक्के शेअर्स दे’’, असे मला सांगितले. हा सर्व व्यवहार त्यांचे विश्वासू गिरीश पवार हे पाहतील, असेही स्पष्ट केले. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा दानवे नाशिकला आले, ताज हॉटेलमध्ये बैठक घेतली, 25 कोटींचा व्यवहार ठरविला, असा अहिरे यांचा आरोप आहे. दानवे यांचे विश्वासू गिरीश पवार यांनी परस्पर मुंबईत रजिस्टर कार्यालयातून आमच्या संमतीविना कंपनीचे 14 टक्के शेअर्स गिरीश नारायण पवार, सतीश कश्मिरीलाल अग्रवाल यांच्या नावावर वर्ग केले आणि त्या बदल्यात आतापर्यंत आम्हाला 14 कोटी 34 लाख रुपये मिळाले. मात्र, उर्वरित 10 कोटी रुपये दिलेच नाहीत, असा अहिरे यांचा दावा आहे. अनेकदा तगादा लावूनही पैसे मिळत नसल्याचा आरोप करत अहिरे यांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

कैलास अहिरे यांच्या तक्रारीवरून दानवे यांचे नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह गिरीश नारायण पवार, कौस्तुभ शेखर लटके, सतीश कश्मिरीलाल अग्रवाल, धीरेंद्र महेंद्र प्रसाद, संजय सुभाश कतिरा, सुभाश हंसराज कतिरा व मंदार यांच्याविरुद्ध पोलिसांनी दहा कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.