कांदिवलीत शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकाकडून 11 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकी पेशाला काळीम फासणारी घटना मुंबईतील कांदिवलीत उघडकीस आली आहे. 11 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच शाळेत मुलींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण?

कांदिवलीतील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना तक्रार केली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुटल्यानंतर शिक्षकाने आपल्याला बोलावले आणि अयोग्यरित्या स्पर्श केल्याचे मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले.

मुख्याध्यापकांनी मुलीच्या पालकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवत त्याआधारे शिक्षकाविरोधात शिक्षकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, 2012 च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांचेही जबाब नोंदवण्यात आले असून पोलिसांनी आरोपी शिक्षकालाही चौकशीसाठी बोलावले आहे.

पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासले जात असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.