
हिंदुस्थानी नौदलाच्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या महाकाय युद्धनौकेवर आग लागल्याची घटना आज घडली. कर्नाटकातील कारवार येथील समुद्रात असताना विक्रमादित्यवर आग लागल्याचे सांगितले गेले. विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका असून देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये तिचे महत्त्व आहे. कारण विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर लढाऊ विमानेही तैनात असतात. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश नौदलाच्या मुख्यालयातून देण्यात आले आहे. युद्धनौकेवर उपलब्ध अग्निमन यंत्रणेच्या सहाय्याने कर्मचाऱयांनी आग आटोक्यात आणली.

























































