अग्निशमन कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी भायखळ्यात स्पेशल कोविड हेल्थ सेंटर

287

पालिकेच्या ‘कोविड योद्धा’ कर्मचारी- अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले असून आतापर्यंत अग्निशमन दलातील तीन जवानांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या भायखळा येथील अग्निशमन मुख्यालयातील नव्या इमारतीत अग्निशमन दलातील कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सुविधायुक्त ३० बेडची व्यवस्था करण्यात असून २४ तास डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तैनात आहेत.

पालिकेच्या अग्निशमन दलावर सध्या अग्निशमन, बचावकार्याबरोबरच संपूर्ण मुंबईत निर्जंतुकीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये सुमारे २५० कर्मचार्‍यांच्या माध्यमातून दोन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. मात्र कोरोना रोखण्याची काम करताना काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. २८ मेपर्यंत ४१ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या कर्मचारी-अधिकार्‍यांसाठी हे कोरोना केअर सेंटर – २ सुरू करण्यात आले आल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली. लवकरच बोरिवली गोराई रोडवरील अग्निशमन केंद्राजवळ आणखी एक कोरोना केअर सेंटर सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईभर निर्जंतुकीकरण वेगात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईभर निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये हॉस्पिटल्स, मंडई , सार्वजनिक ठिकाणं, सोसायट्या, रस्ते, बस स्टॉप या ठिकाणी १७ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल आणि १५ मिस्ट ब्लोविंग मशिन्सच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. यामध्ये हाय प्रेशर पंपच्या माध्यमातून सोडिअम हायपोक्लोराइड पाण्यात मिसळून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत निर्जंतुकीकरणासाठी १ लाख ३० हजार लिटर हायपोक्लोराईड निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात आल्याची माहिती उप-प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र चौधरी यांदी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या