
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरीत आज रात्री आठच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लाकडाची सहा गोदामे जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मरोळ नाक्याजवळ नौपाडा नरूचा पाडा या ठिकाणी ही आग लागली. एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतान अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे परिसरात लोकांमध्ये घबराट पसरली. लाकडाच्या गोदामाला आग लागल्याने क्षणात आगीचा भडका उडाला. ही आग लेव्हल-2 ची होती. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी चार फायर इंजिन, चार वॉटर टँकर तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले. मात्र या ठिकाणी दाटीने असलेल्या लाकडाच्या वखारींमुळे आग अधिक भडकली. आगीच्या धूर पसरल्याने यात चारजण जखमी झाले. त्यांच्यावर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

























































