रास्ता पेठेसह बिबवेवाडीत आगीच्या घटना; आगीत दोन दुकाने, सजावट साहित्य दुकानांचे नुकसान

पुणे शहरातील रास्ता पेठेसह बिबवेवाडीतील एका दुकानात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील इमारतीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत तळमजल्यावरील दोन दुकाने, तीन फ्लॅटला झळ पोहचली आहे. त्याशिवाय तळमजल्यावरील रखवालदाराची खोली जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

रास्ता पेठेतील अपोलो चित्रपटगृहासमोर मद्रासी गल्ली असून गल्लीत तळमजल्यावर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका इमारतीला अचानक आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीची झळ इमारतीतील तीन फ्लॅटला बसली आहे. तळमजल्यावर वाहनांच्या सुट्टे भाग विक्रीचे दुकान आहे. आग दुकानात लागल्यानंतर भडकल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. त्याशिवाय बिबवेवाडीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या सजावट दुकानातील साहित्यास बुधवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरले होते. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

आपली प्रतिक्रिया द्या