
सरकारची मालमत्ता जणू आपल्या वाडवडिलांची संपत्तीच असल्याच्या थाटात तिचे नुकसान करण्याच्या वृत्तीत वाढच होत आहे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या आसनांच्या गादीवर ब्लेड किंवा टोकदार वस्तूने वार करून त्यांचे कव्हर फाडण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. अशा प्रकारे टवाळखोर प्रवाशांकडून मार्च 2018 पासून 1500 आसनांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी वर्षाला 15 लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागत आहे.
उपनगरीय लोकलच्या पहिल्या दर्जाच्या आसनांना प्रवाशांच्या सोयीसाठी फोमच्या गाद्या बसविण्यात आल्या असून त्यांना रेग्झीनचे कव्हर आहे. या कव्हरवर प्रवाशांकडून ब्लेडने वार करून ही आसने फाडण्याचे प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहेत. फोमच्या सीटचे कव्हर फाडून त्यातील स्पंज व काथ्या काढून टाकला जात असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. अशा आसनांचे सीट कव्हर केवळ बदलून चालत नाही तर संपूर्ण सीट बदलावी लागत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
हे प्रकार कुठे घडतात…
बेलापूर, पनवेल, वाशी, ठाकुर्ली, टिटवाळा, कर्जत, अंबरनाथ, वांगणी, कर्जत, कोपरखैरणे येथे रात्री यार्डात लोकल उभ्या केल्या असताना असे प्रकार घडत असावेत असा अंदाज आहे. मध्य रेल्वेच्या मेनलाइनवर ठाकुर्ली आणि हार्बर मार्गावरील कोपरखैरणे यार्डात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची गस्त वाढविण्यात आली आहे. लोकल प्रवासातदेखील कमी गर्दीच्या वेळेत टवाळखोर, टपोरी लोकांकडून रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करण्याचे उद्योग सुरू असतात. त्यामुळे लोकलमध्ये सीसीटीव्ही लावण्याची रेल्वे बोर्डाची योजना आहे.



























































