
स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अमेरिकेतील सीएटल शहरात अनावरण करण्यात आले आहे. पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील एखाद्या शहरात प्रशासनाकडून त्यांचा अशा प्रकारे पूर्णाकृती पुतळा बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
स्वामी विवेकानंदांचा हा भव्य कांस्य पुतळा डाऊनटाउन सीएटलमधील गजबजलेल्या वेस्टलेक स्क्वेअर (Westlake Square) येथे स्थापित करण्यात आला आहे.
शनिवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात सीएटलच्या महापौर केटी विल्सन आणि सीएटलमधील हिंदुस्थानचे महावाणिज्य दूत प्रकाश गुप्ता यांच्या हस्ते या पुतळ्याचे संयुक्तपणे अनावरण करण्यात आले.
स्वामी विवेकानंदांचा हा पूर्णाकृती पुतळा हिंदुस्थानी शिल्पकार नरेश कुमार कुमावत यांनी साकारला आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान अमेरिकेत करण्यात आला आहे.

























































