Agni Prime Missile – हिंदुस्थानचा अग्निबाण! 2000 किमीपर्यंत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची रेल्वेतून यशस्वी चाचणी

हिंदुस्थानने संरक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. हिंदुस्थानने गुरुवारी अग्नि-प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र लाँच करण्याची पद्धत काहीशी वेगळी होती. त्यामुळे सध्या याची देशभरातून चर्चा होत आहे. आत्तापर्यंत जमिनीवरून, जहाजातून किंवा विमानातून क्षेपणास्त्र लाँच केले गेले. मात्र, हे सर्वात पहिले क्षेपणास्त्र आहे जे रेल्वेतून सोडण्यात आले आहे.

हिंदुस्थानने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून अग्नि-प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अग्नि-प्राईम हे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. मध्यम श्रेणीतील हे क्षेपणास्त्र 2000 किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत मारा करण्यास सक्षम आहे. ही चाचणी ओडिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये घेण्यात आली. ही चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) आणि सशस्त्र दलांच्या पथकाने केली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाबद्दल टीमचे अभिनंदन केले आहे. हिंदुस्थानने रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून मध्यम पल्ल्याच्या अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे पुढील नव्या पिढीचे क्षेपणास्त्र 2000 किलोमीटरपर्यंत कक्षेसाठी डिझाइन केलेले आहे. यामध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.

इंटरमीडिएट रेंज अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) आणि सशस्त्र दलांच्या पथकाचे अभिनंदन. ज्या देशांनी आत्तापर्यंत ऑन द मूव्ह रेल नेटवर्कमधून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करण्याची क्षमता ठेवली आहे, या यशस्वी उड्डाण चाचणीमुळे हिंदुस्थानचा आज त्याच निवडक देशांच्या यादीत समावेश झाला आहे, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.