
गेल्या वर्षी मत्स्य हंगामात सलग पाच महिने मत्स्यदुष्काळात होरपळलेल्या रापण व गिलनेट (छोटी बोट) धारक पारंपारिक मच्छीमारांसमोरील मत्स्य दुष्काळाचे ढग यावर्षी दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. एलईडी मासेमारीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. १ ऑगस्ट पासून मत्स्य हंगाम सुरू झाला तरी गेल्या 40 दिवसाच्या कालावधीत साधारणपणे केवळ दहा दिवसच मासेमारी करता आली. या दहा दिवसांमध्ये सुद्धा समाधानकारक कॅच न मिळाल्याने आपले पुढे काय होणार? याचीच चिंता मच्छीमाराना भेडसावत आहे.
सरकार कायदे करते, पण कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नाही. आमदारांनी अनधिकृत एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका मालकांची नावे मत्स्य विभागाला दिली खरी, परंतु त्यांच्यावर कारवाई करणे सोडाच साधी दखलही मत्स्य विभागाकडून घेण्यात आली नाही. आंदोलनकर्त्यां मच्छीमारांना केसेसची भीती दाखवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. या साऱ्या दुष्टचक्रात मच्छिमार सापडले असून आपला व्यवसाय आता वाचवणार कोण? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
परप्रांतीय तुपाशी, स्थानिक उपाशी
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मत्स्य दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून परप्रांतीय पर्ससीन हायस्पीड नौकांनी घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी सुरू केली आहे. यात गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात या राज्यातील नौकांचा समावेश आहे. या अनधिकृत मासेमारी सुरू असताना पारंपारिक मच्छिमारांच्या जाळीत मासळी मिळत नसल्याने सध्या किनारपट्टीवर परप्रांतीय तुपाशी, स्थानिक उपाशी अशी स्थिती निर्माण झाले आहे.
मत्स्य विभागाची गस्ती नौका कुठे?
मत्स्य हंगाम सुरू असताना परराज्यातील नौकांनी धुडगूस घातला आहे. मालवण येथील मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय विभाग कोणतेही करवाई करत नसल्याची तक्रार स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. यावेळी तात्काळ गस्ती नौका उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मच्छीमाराना दिले होते. मत्स्य विभागाची गस्ती नौका समुद्रातील वादळी वाऱ्यांमुळे देवगड बंदरात अडकून राहिली होती. मात्र सद्यस्थितीत परप्रांतीय नौका मासेमारी करत असताना गस्ती नौका व मत्स्य विभागाचे अधिकारी कोणतेही कारवाई करताना दिसत नसल्याने मच्छीमारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मच्छीमारांना मासे नाही
महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर 1 ऑगस्टपासून मत्स्य हंगाम सुरू झाला. मात्र एक महिन्याचा मत्स्य हंगाम बुडाला. सद्यस्थितीत परप्रांतीय नौका समुद्रातील मासळी ओरबडून नेत असल्याने मच्छिमारांना मासे खाणेही मुश्किल बनला आहे. यापेक्षा मत्स्य दुष्काळाचे दुसरे मोठे उदाहरण होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मच्छीमारांमधून व्यक्त केली जात आहे.
मत्स्यदुष्काळ जाहीर करण्याची वाढती मागणी
मत्स्यदुष्काळाच्या मागणीसाठी पारंपरिक मच्छीमारांनी उचललेलं पाऊल शासकीय निकषांना दिलं गेलेलं एक आव्हानच आहे. मच्छीमारांचं म्हणणे आहे की, उठसूठ मत्स्यदुष्काळाची मागणी आम्ही कधी सरकारकडे केलेली नाही. पण यंदा परिस्थिती खरच बिकट आहे. मत्स्यदुष्काळाची कारणे वेळोवेळी सरकारला सांगितली. पण त्यावर ठोस उपाय काहीच न झाल्याने परिस्थिती बिकट बनलीय.


































































