मसालेदार…फिश फ्राय

मीना आंबेरकर

साहित्य …1 मोठे पापलेट, मोठय़ा नारळाची अर्धी कवड, हिरव्या मिरच्या 7 ते 8, थोडी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, आले अर्धा इंच, मीठ एक चमचा, थोडा लिंबाचा रस.

कृती…पापलेटचे डोके, पंख, शेपटी काढून टाकून धारदार सुरीने एका बाजूस पापलेट चिरावा. पोट उघडून पोटातील नळी असलेला भाग काढून टाकावा. पापलेट स्वच्छ करावा. नारळ, आले, लसूण, जिरे, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस सर्व एकत्र बारीक वाटावे. चटणी थोडी सैलच ठेवावी. नंतर ही चटणी माशाच्या पोटात भरावी. भरून उरलेली चटणी वरती चोळावी. तव्यावर तेल गरम करून त्यावर हा मासा हलक्या हाताने तळावा. तव्यावर पोकळ झाकण घालावे. मधून मधून पाण्याचे हबके मारून मंद आचवर मासा दोन्ही बाजूंनी तळावा.

स्कॉच एग्ज

साहित्य…अर्धा किलो खिमा, अर्धा किलो बटाटे, 1 मध्यम कांदा किसलेला, 4 मिरच्या, 15 लसूण पाकळय़ा, 4 लवंगा, 6 काळे मिरे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 चमचे तेल व तळणासाठी तेल 1 वाटी बेड क्रम्स, मीठ, 5 उकडलेली अंडी, 1 अंडे फेटून.

कृती… मिरच्या, लसूण, लवंगा, मिरे दालचिनी एकत्र बारीक वाटावी. कढईत 3 चमचे तेल गरम करावे. त्यावर कांदा परतून घ्यावा. नंतर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत परतावा. त्यावर खिमा मीठ घालून शिजू द्यावा. पूर्ण सुका करावा. बटाटे मऊ उकळून साल काढून मॅश करावेत. चवीप्रमाणे मीठ घालावे. बटाटे आणि खिम्याचे मिश्रण एकत्र चांगले मळावे. या मिश्रणाचे पाच सारखे भाग करावेत. एकएका भागाचे गोळे करावेत. वाटीसारखे करावे. उकडलेल्या अंडय़ाची कवच काढून एक एक अंडे या वाटीत ठेवावे. ही वाटी अंडय़ाभोवती गुंडाळावी. अंडय़ाचा आकार दिसला पाहिजे. नंतर हा गोळा फेटलेल्या अंडय़ात बुडवावा. बेडच्या चुऱयात घोळवावा. भरपूर तेलात लालसर तळावा.

mutton-2

रोगन जोश
साहित्य …अर्धा किलो मटण, 100 ग्रॅम कांदे, 100 ग्रॅम टोमॅटो, 100 ग्रॅम दही, तीन कश्मिरी मिरच्या, दीड चमचा तिखट, 1 चमचा हळदपूड, 1 चमचा खसखस, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा धणे, 2 मसाला वेलची, 6 हिरवी वेलची, 5 ते 6 लवंगा, 12 मिरे, 1 छोटे जायफळ, अर्धी वाटी सुके खोबरे कीस, आले 1 इंचाचे दोन तुकडे, 10 ते 12 लसूण पाकळय़ा, दोन तीन काडय़ा जायपत्री, 150 ग्रॅम तेल किंवा तूप, 25 बदाम, मीठ.

कृती…धणे, शहाजिरे, बदाम, खसखस, मसाला वेलची, लवंगा, काळे मिरे, जायफळ, एकत्र कोरडेच भाजून घ्यावे. खोबरेही कोरडेच भाजून वेगळे ठेवावे. कश्मिरी मिरच्या थोडय़ा पाण्यात भिजवून ठेवाव्यात. त्याच पाण्यात भाजलेला मसाला, भिजवलेल्या मिरच्या आले, लसूण, सगळे नीट बारीक वाटून घ्यावे. कांदा किसून घ्यावा. हिरव्या वेलदोडय़ाची बारीक पूड करावी. मटण स्वच्छ करून तुकडे करून ठेवावे.

कुकरमध्ये किंवा पातेल्यात तूप किंवा तेल गरम करावे. चांगले तापल्यावर वेलची पूड घालावी. लगेच किसलेला कांदा घालावा. लालसर परतावा. आच मंद ठेवावी. नंतर वाटलेला मसाला घालावा. तेल सुटेपर्यंत परतावा. नतंर दही आणि चिरलेले टोमॅटो घालावेत. पुन्हा तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर मटणाचे तुकडे घालून मटण लाल होईपर्यंत परतावे. मीठ घालणे. दोन वाटी पाणी घालावे. मऊ शिजेपर्यंत मंदाग्नीवर ठेवावे. वाढताना चिरलेली कोथिंबीर घालून वाढावे.

fish-final

मुर्ग मसल्लम
साहित्य…1 मोठी चिकन, दोन मोठे कांदे 5-6 मध्यम टोमॅटो, आले 1 इंच, लसूण 17-20 पाकळय़ा, लाल सुक्या मिरच्या 3-4, हळदपूड 1 टे.स्पून, धणे-जिरे पूड 3 टे.स्पून, लवंगा 4-5, काळे मिरे 10-12, दालचिनी तुकडा 2 इंच, मीठ. 1 टे.स्पून दही, तेल पाऊण वाटी, थोडासा लाल रंग.

कृती…चिकन साफ करावे. मोठे चार तुकडे करावेत. पंखाचा, मानेचा भाग काढून टाकावा. कांदे चिरावेत. नंतर लसूण, आले, लवंगा, मिरे, दालचिनी, धणे-जिरे पूड, कालमिरच्या, मीठ एकत्र करावेत. कांद्याबरोबर हे सगळे जिन्नस बारीक वाटावेत. टोमॅटोचा रस काढून वेगळा ठेवावा. वाटलेल्या मसाल्यात 1 चमचा दही घालावे. या मिश्रणात चिकनचे तुकडे घालावेत. अर्धा तास मुरू द्यावे. पातेल्यात तेल गरम करावे. त्यावर प्रथम मुरत ठेवलेल्या मिश्रणातील तुकडे बाजूला काढून दोन मिनिटे परतावे. नंतर सगळ मसाला घालून चिकन शिजू द्यावे. रस फार पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. चिकन शिजत आल्यावर टोमॅटोचा रस घालावा. पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यावे. शेवटची दोन मिनिटे लाल रंग दुधात मिसळून उकळावे. गरमागरम नान, किंवा पराठय़ाबरोबर सर्व्ह करावे.