मासळी महागल्याने खवय्यांचे हाल, वादळांच्या मालिकेने मच्छीमार देखील मेटाकुटीला

634

सध्या बाजारात मासळीचा मोठा तुटवडा भासतो आहे. जी काही मासळी उपलब्ध होते ती प्रचंड महाग आहे. त्यामुळे खवय्यांचे हाल होत आहेत. अवकाळी पाऊस आणि वारंवार वातावरणातील बदलांमुळे ही परिस्थिती ओढावली आहे.

मासळी बाजारात मच्छीची आवक कमी असल्याने सध्‍या पापलेटची जोडी हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. सुरमई, कोळंबी, घोळ सारखे मासे खिसा खाली करतात. परिणामी गजबजलेल्या मासळी बाजारात तुरळक गर्दी पाहायला मिळते.  यंदा मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले, तरी अतिवृष्टीनंतर वादळांची मालिका यांमुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमाराना बसलाय. अजूनही शेकडो बोटी रायगडच्या विविध किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन देखील अपेक्षित मासे मिळत नाहीत त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवणे कठीण होऊन बसले आहे .

पर्यटन व्‍यवसायाला फटका
दिवाळीपासून रायगडच्‍या किनाऱ्यावर पर्यटन व्‍यवसाय बहरण्‍यास सुरूवात होते. यंदा दिवाळीतच क्‍यार वादळाने फटका दिला त्‍यामुळे पर्यटक फिरकलेच नाहीत. हळूहळू वातावरण निवळल्‍यानंतर पर्यटकांची गर्दी होवू लागली. इथं येणारे पर्यटक इथल्‍या निसर्ग सौंदर्याबरोबरच ताज्‍या आणि चवदार मासळीचा आस्‍वाद घेण्‍यासाठी येत असतात. परंतु या मोसमात एकतर मासे मिळत नाहीत आणि जी काही मिळते आहे ते महाग आहेत. त्‍यामुळे हे मासे घेवून पर्यटकांना काय दराने खाऊ घालायचे असा प्रश्‍न इथल्‍या कॉटेजेस आणि हॉटेल व्‍यावसायिकांनाही पडला आहे.

साधारण 1 ऑगस्‍ट किंवा नारळी पौर्णिमेपासून कोकणात मासेमारीचा हंगाम सुरू होतो. परंतु यंदा सप्‍टेंबर पर्यंत पाऊस आणि वादळी वातावरण होते. खराब हवामानामुळे अनेकदा समुद्रात गेलेल्‍या बोटी परत बोलावण्‍याची वेळ आली. ऑक्‍टोबर महिन्‍यात क्‍यार चक्रीवादळाचा मोठा परीणाम मासेमारीवर झाला. हजारो बोटी किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्‍याची वेळ आली . पकटीवर बसून स्‍वप्‍नांची जाळी विणण्‍यापलीकडे काहीच काम नव्‍हते. सद्याच्‍या स्थितीत जवळपास बोटी नेवून मासे मिळणे केवळ दुरापास्‍त झाले आहे.  त्‍यामुळे खोल समुद्रात मासे पकडण्‍यासाठी जावे लागते . तेथे जावून मासे मिळाले तर ठीक नाहीतर रिकाम्‍या हाताने परतावे लागते. या फेरीवर केलेला खर्चही वाया जातो. मग कुणी जायला धजावत नाही.

‘आता मासे घ्‍यायला आलो तर खूपच महाग आहे. आम्‍हा सामान्‍य माणसाला परवडणारे नाहीत . दुसरीकडे पावसाने भाजीही महाग केली आता खायचे काय हाच प्रश्‍न आहे . ’ – मुरलीधर पाटील , ग्राहक

सध्‍या बाजाराची अवस्‍था वाईट आहे. स्‍थानिक मासे नाहीतच. बाहेरून मागवावे लागत आहेत आणि ते बाहेरून आणून विकायला परवडत नाही. मासे महाग झाल्‍याने ग्राहकदेखील फिरकत नाहीत. हातातोंडाची गाठ करणे कठीण होवून बसले आहे. – रत्‍नांजली पेरेकर, मासेविक्रेती महिला

सध्‍या माशांचे दर
पापलेट 700 ते 1000 रूपये जोडी
सुरमई छोटी 400 रूपये मोठी 700 रूपये
कोळंबी मोठा वाटा – 600 रूपये , छोटा वाटा – 400 रूपये
घोळ – तुकडी 300 ते 400 रूपये
करली – छोटी 400 रूपये मोठी 700 रूपये

आपली प्रतिक्रिया द्या