मालवणात पर्यटकांसाठी ‘मत्स्य संग्रहालय’ खुले; 150 मत्स्य प्रजाती

669

मालवणात सागरी पर्यटन सफर करण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी येतात. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, स्कुबा ड्रायव्हिंग, वॉटरस्पोर्टस यासह अनेक गोष्टींचे पर्यटकांना आकर्षण आहे. आता मालवणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘मत्स्य संग्रहालय’ हे पर्यटनाचे नवे दालन खुले झाले आहे. मालवण येथील राजेंद्र केळकर या मत्स्य अभ्यासक तरुणाने मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कुंभारमाठ येथे मीना मत्स्य संग्रहालयाची उभारणी केली आहे. खाऱ्या, गोड्या व निमखाऱ्या पाण्यातील 150 प्रकारच्या मत्स्य प्रजाती या संग्रहालयात ठेवण्यात आल्या असून त्या पर्यटक व मत्स्य प्रेमींना पाहता येणार आहेत. लवकरच परदेशी समुद्रात आढळणाऱ्या मत्स्य प्रजातीही या संग्रहालयात आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली.

मालवणातील पर्यटनाने मोठी क्रांती घडविली आहे. मासेमारीला पूरक ठरलेल्या पर्यटन व्यवसायाने रोजगाराचे दालन उभे केल्यानंतर पर्यटन व्यावसायिकांनी नाविन्यपूर्ण पर्यटन प्रकार पर्यटकांसाठी खुले केले. वेगवेगळे पर्यटन प्रकल्प, पर्यटन स्थळे विकसित करण्यात स्थानिकांचा मोठा सहभाग आहे. याच धर्तीवर राजेंद्र केळकर या तरुणानेही पर्यटनात काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याची संकल्पना आखली. कोकणातील पर्यटन राजधानी म्हणून मालवणकडे पाहिले जाते. मात्र, मालवणनगरीत मत्स्य संग्रहालय नसल्याने येथील सागरी विश्वात कोणकोणत्या मत्स्य प्रजाती आहेत, याची माहिती स्थानिकांसह पर्यटकाना उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे केळकर यांनी पुढाकार घेत मत्स्य संग्रहालयातून पर्यटन, रोजगार आणि अभ्यासाचे नवे दालन उभे करून दिले आहे.

बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स ही पदवी प्राप्त करून गेली 22 वर्षे केळकर हे मत्स्य विषयक विविध संस्था, ऑफिस, कॉलेज याठिकाणी काम करत आहेत. मात्र मालवणात मोठे मत्स्यालय उभारावे ही कल्पना त्यांच्या मनात होती. जागेचा अभाव व अन्य काही तांत्रिक कारणामुळे मत्स्यालयाला मूर्त रूप येत नव्हते. अखेर केळकर यांचे स्वप्न साकार झाले आहे. मुख्य मार्गालगत मालवण शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वसलेल्या कुंभारमाठ येथे मीना मत्स्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. 26 जानेवारी पासून हे संग्रहालय पर्यटकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे. मालवणसारख्या पर्यटननगरीत पर्यटकांना समुद्री विश्वातील मत्स्य संपदा अनुभवता येणार आहे. या संग्रहालयात मत्स्य प्रजातीची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणुकही करण्यात आली आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्याचा आमचा हेतू आहे. यासाठी माशांच्या विविध प्रजाती, शंख, शिंपले व पाण वनस्पती यांच्या सानिध्यात काही वेळ राहून एका अद्वितीय आनंदाचा अनुभव घ्यायला मिळावा, यासाठी हे संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. मत्स्य महाविद्यालय शिरगाव (जि. रत्नागिरी), मत्स्य संग्रहालय झाडगाव (रत्नागिरी), सीआयएफटी (मुंबई), एमपीआयडीए (मुंबई), उतेकर फिशरीज मुंबई व उत्का फूड मंगलोर या संस्थाचे तसेच अन्य काही मत्स्य अभ्यासक मत्स्यप्रेमी यांचेही या प्रकल्पाला सहकार्य व मार्गदर्शन आहे, असेही केळकर यांनी सांगितले. गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे पालन व मासे विक्री हा व्यवसाय अर्थार्जनाचे साधन बनू शकतो. लाखो रुपयांची उलाढाल करण्याची ताकद या व्यवसायात आहे. त्यामुळे येथील शोभिवंत मासे विदेशात निर्यात करण्याच्या दृष्टीनेही आपला प्रयत्न असल्याचे केळकर यांनी सांगितले. ‘मीना’ मत्स्य संग्रहालयात पर्यटकांना वेगवेगळ्या आकारातील, रंगीत तसेच विविध जातींच्या मासळीच्या प्रजाती, पाण वनस्पती, शंख, शिंपले पाहायला मिळणार आहेत. तसेच या प्रकल्पातून माशांच्या जीवनशैलीचा, लुप्त होत जाणाऱ्या मत्स्य प्रजातींचा अभ्यास, वाढत्या प्रदूषणाचा होणारा दुष्परिणाम, अनैसर्गिक व पारंपारिक मासेमारीचा अभ्यासही केला जाणार आहे, माश्यांची बदलत चाललेली जीवन साखळी, काही प्रजातीत बदलत चाललेला प्रजनन कालावधी याचाही अभ्यास होणार आहे, असेही केळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या