माशांच्या कातडीपासून बेल्ट, लेडीज पर्स आणि हातमोजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणाऱया रोऊ, कटला, घोळ, पाकट, टय़ुना माशांच्या कातडय़ापासून लेडीज पर्स, घडय़ाळाचे पट्टे, पाकिटे, बेल्ट गाँगलच्या केस आणि ग्लोव्हज अशा सुंदर आणि टिकाऊ वस्तू तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने सुरू केला आहे. परदेशात माशांच्या कातडय़ापासूनच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्रात हा प्रयोग प्रथमच राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किमी लांबीच्या समुद्रकिनाऱयावर असंख्य प्रकारचे मासे मिळतात. मासे ताजे असले तरच भाव मिळतो. खराब झाल्यावर माशांचा भाव उतरतो. त्यामुळे माशांच्या कातडय़ापासून विविध वस्तू तयार करण्याची योजना मत्स्यव्यवसाय विभागाने आखली आहे. त्याची सुरवात मुंबईत तारापोरवाला मत्स्यालयात झाली आहे. आतापर्यंत माशांच्या कातडय़ापासून काही वस्तू तयार झाल्या आहेत.

कोणत्या वस्तू तयार होतात

लेडीज पर्स, लहान पर्स, कमरेचा पट्टा, घडय़ाळाचा पट्टा, पेपरवेट, गॉगल-चष्मा ठेवण्याची केस किचेन, की पाऊच, डायरीचे कव्हरपाकीट, पोलिसांच्या वायरलेससेटचे कव्हर, गोव्हज(हातमोजे)

कोणत्या माशांपासून

तिलापिया(तिलापी), रोहू, कटला, पंगेशिया(पंगस) घोळ, पाकट(स्टींग रे) वाम, कूपा(टय़ुना), चप्पल मासा(लेदर जॅकेट). खवले असलेल्या आणि खवले नसलेल्या इतरही माशांच्या कातडीपासून वस्तू तयार होतात.

लष्करासाठी ग्लोव्हज

हाडं गोठवून टाकणाऱया थंडीत देशांच्या सीमांचे संरक्षण करणाऱया जवानांसाठी हातमोजे(ग्लोव्हज) दिले जातात. जनावरांच्या कातडय़ापासून तयार होणारे हातमोजे जड असतात पण माशांच्या कातडय़ापासून तयार होणारे हातमोजे वजनाला हलके, अधिक मजबूत आणि उबदार असतात.

मासे मच्छीमारांचा कल्पतरू

मासा हे कल्पतरू म्हणून ओळखला जातो. माशाचा तीस टक्के भाग खाण्यायोग्य असतो. उर्वरित भाग खतासाठी वापरतात. एक किलो माशातून सात ते दहा टक्के कातडी मिळते.

मुंबई मोठी बाजारपेठ

मुंबईला 75 टक्के समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई ही मोठी बाजारपेठ आहे. त्याचा मोठा फायदा मच्छीमारांना होईल. यावर अधिक संशोधन होण्याची गरज मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी व्यक्त केली.

मच्छीमारांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी ‘फिश ओ क्राफ्ट’ ही योजना आहे. माशांच्या कातडय़ापासून वस्तू तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता फिश फेस्टिवल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून माशांच्या कातडय़ांपासूनच्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळवून दिली जाईल. – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री