मच्छिमार व शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

न्हावा-शिवडी सागरी महामार्ग (एमटीएचएल) बाधित शेतकरी व मच्छीमारांच्या प्रश्नासंदर्भात सिडकोचे चेअरमन आ. प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील निर्मल भवनमध्ये गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत न्हावा- शिवडी सागरी सेतु मधील मच्छिमार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे, कामगार नेते महेंद्र घरत, न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पाटील, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लंवगारे यांच्यासह भूमी व नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व प्रथम प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांचे, भूखंड पुष्पक नगर ऐवजी उलवा नोड मध्ये ६ महिन्याचे आत स्थलांतकरीता करण्याचे व अ + ब हे दोन्ही भूखंड म्हणजे जमिनीचा साडेबावीस टक्के प्रमाणे पूर्ण परतावा देण्याचे ठरले. तसेच प्रकल्पबाधित ग्रामपंचायतींना(गव्हाण, जासई, चिर्ले) किमान ५ कोटी रुपये विकासनिधी देण्याचे मान्य करण्यात आले असून सागरी सेतू महामार्गामुळे विस्थापित होणाऱ्या घरांना एम एम आर डी ए मार्फत पुनर्वसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने महामार्ग – टोल मार्ग होणार असून, टोल वसुली केंद्रावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला प्राधान्याने नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

तसेच सागरी सेतू महामार्ग बाधित यादीत आलेल्या मच्छिमार लाभधारकांची अंतिम छाननी करून मच्छिमारांना १ महिन्याच्या आत अर्थात १ डिसेंबर २०१८ च्या पूर्वी वैयक्तिक बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्याचे ठरले असून सिडको व एमएमआरडीएची १५ दिवसांनी सिडको भवन येथे बैठक घेऊन या मागण्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच उर्वरित गव्हाण, जासई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सिडकोला सहमतीने दिलेल्या २५० हेक्टर जमिनी संदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यांना ६ महिन्याच्या आत उलवा नोड सेक्टर २७ मध्ये भूखंड देण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने केली जाणार असून स्वतः सिडको चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली याचा आढावा प्रत्येक आठवड्यात घेण्यात येणार आहे. तसेच न्हावा- शिवडी सागरी सेतु मधील मच्छिमार शेतकऱयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासनही एमटीएचएलच्यावतीने देण्यात आले आहे.