
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक मासेमारी पात (होडी) बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. पातीवरील चारही मच्छीमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. मात्र मासेमारी होडीची माहिती मिळाली नाही. दरम्यान, मासेमारी बंदी कालावधीत सुरू असलेल्या मासेमारीकडे मत्स्य व्यवसाय विभागाचे दुर्लक्ष असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आर. आर. महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती नाही मात्र चौकशी करण्याचे आदेश त्यांनी मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांना दिले आहेत.
पावसाळी कालावधीत १ जून पासून मासेमारी बंदी असते. १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामास सुरवात होणार आहे. मात्र पावसाळी कालावधीतही काही मच्छीमारांकडून मासेमारी सुरू असल्याचे आज घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे. येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात सकाळी चार मच्छीमार एक पात घेऊन मासेमारीस गेले होते. यात समुद्री उधाण व वार्याचा जोर असल्याने ही पात समुद्रात बुडाली आणि चारही जण समुद्रात फेकले गेले. या चारही जणांनी लगतच असलेला पद्मगड किल्ला पोहत गाठला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही स्थानिक मच्छीमारांनी दुसर्या नौकेच्या साहाय्याने त्यांना सुखरूप किनार्यावर आणले.
सध्या मासेमारी बंदी कालावधी असताना मच्छीमारांची पात बुडाल्याची घटना समोर आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
































































