
>> वरदा चव्हाण
हितार्थ पाटील. वय वर्षे 12 फक्त. पण मैदानी खेळ खेळणं, चमचमीत खाण्यावर नियंत्रण, ध्यानधारणा हे सारे तो अत्यंत समंजसपणे करतो.
नमस्कार मित्रांनो, गेले आठ महिने आपण भेटतोय. वेगवेगळय़ा कलाकारांचे अनुभव वाचतोय, पण आज अशा एका कलाकाराला आपण भेटणार आहोत ज्याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापर्यंत अनेक सीरियल्समध्ये काम केले आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’वर गाजत असलेल्या ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत मी असुरसम्राट जांभासुराची भूमिका करीत आहे. यात मी एका छोटय़ा मुलाला म्हणजेच श्री दत्तभक्त असलेल्या रुद्रला त्रास देतो आहे. तो रुद्र म्हणजेच बालकलाकार हितार्थ पाटील होय. ‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’, ‘कलर्स’वरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकाही त्याने केल्या आहेत.
हितार्थ वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेत नववीत शिकत आहे. इतक्या लहान वयातच आपण आयुष्यात ऍक्टिंगच करायची असं त्यानं ठरवलंय. अर्थात यासाठी त्याच्या आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा आहे. सकाळी सातची शिफ्ट, परत रात्री उशिरापर्यंत शूटिंग, परत दुसऱया दिवशी सकाळी लवकर उठायचं हे सगळं तो खूप एन्जॉय करतो. शिक्षक, मित्रांची मदत होते. सेटवर पुस्तक घेऊन येतो. मधल्या वेळेत अभ्यास करतो. शाळेच्या सहकार्यामुळेच मी हे करू शकतो असं हितार्थ आवर्जून सांगतो. वयाच्या अवघ्या दहा-बारा वर्षीच फिजिकल फिटनेसचं महत्त्व त्याला कळलंय. म्हणूनच सेटवरचे कलाकार, टेक्निशियन यांच्याबरोबर क्रिकेट, बॅडमिंटन असे मैदानी खेळ खेळतो, जे या वयात प्रत्येकाने खेळलेच पाहिजेत. त्याचं प्रेरणास्थान आहे सलमान खान. म्हणूनच कॉलेजात जायला लागल्यावर जिम जॉईन करायचीच असं त्यानं ठरवलंय.
या क्षेत्रात यायचं म्हणजे ऍक्टिंगबरोबर चांगले बॉडी पोश्चर असलंच पाहिजे असं तो म्हणतो. सध्यातरी तो डायटिंग वगैरे करत नाही, कारण तो फक्त बारा वर्षांचा आहे. मी सध्यातरी खूप खाणार कारण हीच ऊर्जा मला नंतर उपयोगी पडेल ना? तो मलाच विचारतो. इतक्या लहान वयातील त्याची समज बघून मी थक्कच झालो. त्याला मासे, चिकन, मटण, थोडक्यात नॉनव्हेज खूप आवडतं. फक्त मंगळवार, गुरुवार आणि दत्तगुरूंच्या सेटवर तो शाकाहारीच खातो. कधीकधी सेटवर चिडचिड होते, मग हितार्थ श्री स्वामी समर्थांचा जप करतो. थोडक्यात अध्यात्मातून योगाभ्यास करतो. मन शांत राहिले की तब्येत आपोआपच चांगली राहते. याचे श्रेय त्याच्या आई-वडिलांना जाते. कारण आई त्याचं खाणं, झोप, अभ्यास याकडे जातीने लक्ष देते, तर वडील त्याच्याबरोबर सेटवर येतात. काम करताना त्याचं बालपण हरवणार नाही याची काळजी घेतात. कारण सतत मेकअप करणं, सीन पाठ करणं याचा मोठय़ांपेक्षा लहान मुलांना त्रास होऊ शकतो. म्हणून त्याचे बाबा आणि श्री दत्तगुरू सीरियलचे सर्वचजण त्याची काळजी घेतात. सेटवर जेवण उशिरा होतं म्हणून घरून आणलेला नाश्ता, फळं खातो. जमेल तेव्हा छानशी डुलकी पण घेतो. सूर्यनमस्कार घालतो. थोडक्यात, त्याच्या वयाला झेपेल असा व्यायाम करतो. जास्त अरबट चरबट म्हणजेच फरसाण, वेफर्स, बेकरी प्रॉडक्टस् खात नाही. मॅगी, नुडल्स, चायनीज भेळ अशा गोष्टींपासून चार हात लांबच राहतो. हितार्थ सांगतो की, मित्रांचे वाढदिवस, पार्टी वगैरे असली की बिनधास्त खातो, पण अतिरेक करत नाही.
बघा मित्रांनो, विचार करा! जर बारा वर्षांच्या हितार्थला सूर्यनमस्कार, श्री स्वामी समर्थांचा जप मानसिक शांततेसाठी करावा, जंक फूडचं मर्यादित सेवन करावं. मोबाईल गेमऐवजी मैदानी खेळ खेळावेत हे समजतं, तर आपणही या गोष्टी करायला हरकत नाही. या बाल कलाकाराचा फिटनेस फंडा अवलंबायला काहीच हरकत नाही. हो ना?

























































