सडपातळ… पण फिट!

499

>> वरद चव्हाण

अभिनेते विकास पाटील. शरीरसौष्ठवापेक्षा सडपातळ शरीरयष्टी आवडते. अर्थात त्यासाठीही मेहनत घ्यावीच लागते.

नमस्कार, फिटनेस फ्रिक्स! काय दिवाळी मस्त साजरी केलीत ना. आता व्यायामाकडे लक्ष द्या. मित्रांनो, कुणाला सलमान खान, जॉन अब्राहमसारखी मस्क्युलर बॉडी आवडते. कुणाला अजय देवगण, अक्षय कुमारसारखी तर कुणाला रितेश देमशुखसारखी लीन (सडपातळ शरीरयष्टी) आवडते तर आजचा आपला सेलिब्रिटी कलाकार आहे गोड चेहऱयाचा, सडपातळ शरीरयष्टीचा विकास पाटील. मित्रांनो, मी विकासला भेटलो. स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या सीरियलमध्ये मी आणि विकास शूटिंगच्या मधल्या वेळात वेळ मिळेल तेव्हा खूप चालायचो. गप्पा मारायचो अर्थात दोघांचा आवडता विषय असायचा व्यायाम.

तर मित्रांनो, आज त्याच्याशी गप्पा मारूया. या लेखाच्या निमित्ताने अर्थात जाणून घेऊया त्याचा फिटनेस फंडा. विकासला लहानपणापासून मैदानी खेळाची आवड होती. शालेय जीवनात तो चमचा-लिंबू, धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि जिंकायचासुद्धा. शाळेच्या खो-खो आणि कबड्डीच्या टीममध्ये असायचा. कॉलेजमध्ये असतानासुद्धा खो-खो, कबड्डी, क्रिकेट असे मैदानी खेळ खेळायचा. कॉलेजात असतानाच त्याने जिमला जायला सुरुवात केली. त्याच जिममधील ट्रेनर विवेक सरांनी विकासच्या डोक्यात अभिनयाचा किडा सोडला. तुझा चेहरा चांगला आहे तर अभिनयाचं क्षेत्र का नाही निवडत? असं विवेक सरांनी विचारलं. फक्त खूप बारीक आहेस, त्यामुळे जिमकडे लक्ष दे असा सल्लाही दिला. मग विकासने व्यायाम मनापासून करायला सुरुवात केली. त्याला जिममध्ये जायला आवडायला लागलं. विकासनं आता अभिनयाचा सीरियसली विचार करायला सुरुवात केली. व्यायामाबरोबरच संतुलित आहार हवाच. अंडी, मांसाहाराची विशेष आवड होतीच. अभिनय करायचं म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल शिदए यांच्याकडे फोटोशूट केले. त्यांनीही काही मोलाच्या टिप्स दिल्या नंतर बोरिवलीतील डाएटेशियन प्रेरणा बावडेकर यांच्याकडे मार्गदर्शनाखाली डाएट ठरवलं. ‘गडबड झाली’ या सिनेमासाठी त्यानं वजन कमी करायचं ठरवलं. कारण या सिनेमात त्याला स्त्री-पात्र रंगवायचं होतं. म्हणून प्रेरणाताईंनी दिलेल्या डाएट प्लॅनप्रमाणे खाण्याच्या वेळा ठरवल्या. अरबटचरबट खाण बंद केलं, पण आपण जेव्हा डेली सोप करतो तेव्हा व्यायामाच्या, जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा पाळता येत नाहीत. म्हणून जमेल तसं आठवडय़ातून 2-3 वेळा कांदिवली येथील ‘परुळेकर जिम’मध्ये जाऊन वर्कआऊट करतो. विकास म्हणतो, डेली-सोप चालू असताना सेटवरच जेवायचे, आराम करायचा. यात शरीर थोडं फटिग होतं. त्यामुळे विकास शक्यतोवर घरूनच डबा नेतो. सेटवरच रोज चालतो. टाईम न लावता जमेल तेव्हा घाम येईपर्यंत चालायचं, आहार चांगला ठेवायचा, थोडं जिभेवरचं नियंत्रण या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी चांगले रिझल्ट दिसतातच. वेळ मिळेल तेव्हा 7000 ते 8000 पावलं चालतोच. कारण डेली सोपच्या वेळी फिजिकल ऑक्टिव्हिटी कमी होते. एक प्रकारचा हेवीनेस येतो अशावेळी चालण्यामुळे शरीर हलकं वाटू लागतं. ज्यांना व्यायाम करायला आवडत नाही त्यांनी किमान 40-45 मिनिटे चालायलाच हवं. घाम येईपर्यंत चालण्यानं तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं. स्किन ग्लो होते.

विकासला स्वतःला लीन बॉडी आवडते. अगदीच एखाद्या रोलची गरज असेल तरच मस्क्युलर बॉडी बनवीन असं तो म्हणतो. ऍक्शन सिन करण्यासाठी अशा बॉडीची गरज असते, पण डेलीसोप, टी.व्ही. सीरियल, नाटक या मध्यमवर्गीय रोलसाठी फिट वाटेल अशीच बॉडी ठेवण्याकडे विकासचा कल आहे. 2-3 दिवस जिम, कार्डिओ, योगा करण्याकडे विकासाचं विशेष लक्ष असतं. प्रेरणा बावडेकरांचं डाएट फॉलो करतो. बॉडी डिटॉक्स होण्याकरिता सकाळी अर्धा पपई, 8-10 अंडय़ातील व्हाईट, जेवताना 1-2 पोळय़ा, भाजी, आठवडय़ातील 4 दिवस नॉनव्हेज, संध्याकाळी कमी खाणं, सूप, चिकन-सूप, बॉईल्ड चिकन असं खातो. विकासबद्दल आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सुखिओ माहिकरी ही जॅपनीझ लाईट थेरेपी फॉलो करतो. ही लाईट थेरपी विकास स्वतः घेतो आणि देतोसुद्धा. नियमितपणे मेडिटेशन आणि वाचन या. गोष्टींमुळे माणूस सकारात्मक विचार करतो. आध्यात्मिक दृष्टिकोन होतो, शरीर शुद्धीकरण होतो असा विकासचा ठाम विश्वास आहे. अर्थात विकासचा हसरा, प्रसन्न चेहरा बघून तुम्हालादेखील विकासला फॉलो करावंसं वाटेल. गृहिणी, विद्यार्थी, नोकरी करणाऱया, शारीरिक कष्ट करणाऱया सर्वांनाच विकास आवर्जून सांगतोय की, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. जमेल तसा व्यायाम करा. चाला, संतुलित आहार घ्या. तुम्ही छान प्रेंझेटेबल दिसलात की, आजूबाजूच्या लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आयुष्य खूप छान आहे. मस्त जगा!

 

आपली प्रतिक्रिया द्या